वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
रविवारी येथे झालेल्या अखिल इंग्लंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मलेशियाच्या ली झी जिया याने डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित ऍक्सेलसेनचा पराभव करत पुरूष एकेरीचे अजिंक्यपद पहिल्यांदा पटकाविले.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या ली जियाने डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित व्हिक्टर ऍक्सेलसेनचा 30-29, 20-22, 21-9 अशा सेट्समध्ये पराभव करत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील पहिल्यांदाच जेतेपद पटकाविले. या लढतीतील पहिला गेम 59 गुणांचा झाला पण जियाने हा गेम केवळ एका गुणाने जिंकून ऍक्सेलसेनवर आघाडी मिळविली, ऍक्सेलसनने दुसरा गेम 22-20 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱया आणि निर्णायक गेममध्ये जियाने 21-9 अशी बाजी मारत ऍक्सेलसेनचा पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली.
जपानच्या नोझोमी ओकुहाराने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात ओकुहाराने थायलंडच्या पी. चोचुवाँगचा 21-12, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत जपानच्या बॅडमिंटनपटूंनी दुहेरीतील तीन अंतिम सामने जिंकले. जपानच्या युता वटांबेने पुरूष दुहेरीतील आणि मिश्र दुहेरीतील अजिंक्यपद मिळविले. पुरूष दुहेरीच्या अंतिम सामन्यात जपानचा वटांबे आणि इंडो यांनी जपानच्या केमुरा आणि सोनोटा यांचा 21-15, 17-21, 21-11 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात वटांबे आणि अरिसा हिगाशिनो या जोडीने युकी केनिको आणि मासुटोमो यांचा 21-14, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव करत अजिंक्यपद मिळविले. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात मासुटोमो आणि नागाहारा या जोडीने फुकुसीमा आणि हिरोटा यांचा 21-18, 21-16 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. कोरोना महामारी समस्येमुळे या स्पर्धेत चीन, दक्षिण कोरिया आणि तैवानच्या बॅडमिंटनपटूंनी भाग घेतला नव्हता.









