क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
ओडिशा एफसीने यंदाच्या आयएसएल फुटबॉल मोसमात मलेशियाचा मीडफिल्डर लिरीडॉन क्रासनिकी याच्याशी करार केला आहे. मलेशियाचा प्रोफेशनल क्लब फुटबॉल क्लब जोहोर ताझिम एफसी या क्लबकडून ऑन-लोनवर तो ओडिशा एफसीला खेळणार आहे. कराराची सर्व प्रक्रिया आता पूर्ण झाली असून लिरीडॉन क्रासनिकी आता आठव्या आयएसएलमध्ये भुवनेशुवरचा क्लब ओडिशा एफसीला खेळताना दिसेल.
29 वर्षीय हा ऍटेकिंग मीडफिल्डर युरोपमध्ये खेळला असून आपल्या प्रोफेशनल फुटबॉलची सुरूवात त्याने झेक प्रजासत्ताकच्या एफके म्लादा बोलेस्लाव या संघातून खेळताना केली. त्यानंतर तो या क्लबातून ऑन-लोनवर तुर्कच्या फॅथीयेस्पोर संघाला खेळला. 2015 मध्ये तो मलेशियाला गेला व तिथे केदाह दारुल अमान फुटबॉल क्लबला खेळला. केदाहसाठी त्याने 2016 मध्ये मलेशिया कप आणि 2017 मलेशिया एफए कप जिंकून दिला.
2019 मध्ये लिरीडॉन क्रासनिकी मेलाका युनायटेड क्लबशी करारबद्ध झाला. जोहोर ताझिम एफसीशी करार केल्यानंतर लिरीडॉन गेल्या जानेवारीत ऑन-लोनवर ऑस्ट्रेलियाच्या ए-लीग मध्ये खेळणाऱया न्यूकासल जेट्स या संघालाही खेळला.
लिरीडॉन हा तीन देशांना खेळला आहे. आल्बानियाच्या 21 वर्षांखालील तर कोसोवा आणि आता मलेशियाच्या सीनियर फुटबॉल संघाला तो खेळला आहे. ओडिशा एफसीचे प्रशिक्षक किको रेमेरीज आणि क्लबचे अध्यक्ष राज अठवाल यांनी लिरीडॉनच्या समावेशाने संघाला निश्चितच बळकटी येणार असल्याचे म्हटले आहे.









