हिवताप फैलाविणाऱया मादी डासाला वांझ करणार
संशोधनादरम्यान 560 दिवसांत घटली डासांची संख्या
जगभरात दरवर्षी मलेरियामुळे (हिवताप) सुमारे 5 लाख लोक जीव गमावतात.हे मृत्यू कमी करणे आणि मलेरियाचे रुग्ण कमी करण्यासाठी वैज्ञानिकांनी नवा प्रयोग केला आहे. वैज्ञानिक मादी डासाला सीआरआयएसपीआर जीन एडिटिंग तंत्रज्ञानाद्वारे वांझ (इनफर्टाइल) करत आहेत. यातून डासांची संख्या नियंत्रित केली जात आहे. हे तंत्रज्ञान ‘गेमचेंजर’ ठरू शकते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे

लंडनमधील इम्पीरियल कॉलेज आणि लिव्हरपूल स्कुल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन मिळून यावर संशोधन करत आहेत. वैज्ञानिक पहिल्यांदाच मादी डासांच्या जीनमध्ये बदल करून ती प्रजननक्षम राहू नये असा प्रयत्न करत आहेत. याकरता वैज्ञानिकांनी डासांची एनाफिलीज गॅम्बी प्रजाती निवडली आहे. ही प्रजाती सब-सहारा आफ्रिकेत मलेरियाचे संक्रमण फैलावण्यासाठी जबाबदार आहे.
3500 हू अधिक प्रजाती
जगभरात 3500 हून अधिक डासांच्या प्रजाती आहेत, पण यातील काही प्रजातीच मलेरिया फैलावण्यास कारणीभूत आहेत. 2019 मध्ये जगभरात मलेरियाचे 23 कोटी रुग्ण सापडले होते. यातील 4 लाख लोकांचा मृत्यू ओढवला होता. तसेच मृत्युमखी पडणाऱयांमध्ये 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे प्रमाण अधिक होते.









