ऑनलाईन टीम / मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंध आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडी कोठडीत असलेल्या अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या खात्यांचा पदभार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे सोपविण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. या प्रस्तावावर आज ठाकरे सरकारने मलिक यांच्याकडील खात्यांचा कार्यभार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे सोपवला. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तर परभणीचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले. तसेच सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिक यांच्याकडील खात्यांचा कार्यभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांकडे देण्याची शिफारस राज्यपालांना केली आहे.
यानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवाब मलिक यांच्याकडील कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तर अल्पसंख्याक मंत्रीपदाची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविली आहे. नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी त्यांचा पदभार इतर नेत्यांकडे देण्यात आला आहे.