ऑनलाईन टीम / मुंबई :
मला गाडीने कानपूरला नेले तर यूपी पोलीस वाटेतच माझा एन्काऊंटर करतील. त्यामुळे मला विमानाने नेण्यात यावे, अशी मागणी विकास दुबे याचा उजवा हात मानला जाणाऱ्या अरविंद त्रिवेदीने आज ठाणे न्यायालयात केली.
शुक्रवारी कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने शनिवारी ठाण्यातून त्रिवेदीसह त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारीला अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांचीही 21 जुलैपर्यंत तळोजा जेलमध्ये रवानगी केली आहे. उत्तर प्रदेश पोलीस येताच या दोघांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याआधी त्यांची कोविड तपासणी केली जाणार आहे.
त्रिवेदी हा एका भाजीच्या गाडीतून उलटसुलट प्रवास करत ठाण्यात पोहचला होता. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर नायक यांनी त्रिवेदी आणि तिवारीला ठाण्यातील नातेवाईकांकडून ताब्यात घेतले होते.