ऑनलाईन टीम / मुंबई :
मला एकही दिवस जाणवलं नाही की, मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्री आहे. जनतेने मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला मुख्यमंत्री नसल्याचे कधीच जाणवलं नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या वतीने बेलापूर येथे आयोजित कार्यक्रमात महिला मासळी विक्रेत्यांना फडणवीस यांच्या हस्ते परवाना वाटप करण्यात आला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, मंदा म्हात्रे यांनी महिलांसाठी अनेक योजना आपल्या काळामध्ये राबवल्या. त्याचा महिलांना नक्की फायदा होईल. नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून विकास झाला. देशातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून हे नेहमी अग्रेसर राहिलं आहे. त्यामुळे असे नेते आणि जनता पाठिशी असल्यामुळे मला मुख्यमंत्री नसल्याचं कधी जाणवलंच नाही. दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे जनतेनेही मला ते कधी जाणवू दिलं नाही.









