खानापूर शहराचे सांडपाणी नदीत : हलात्री नाल्यावरील वाळू उपशाचाही परिणाम
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रामुख्याने मलप्रभा नदीद्वारे नळपाणीपुरवठा केला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून शहरातील सांडपाणी मलप्रभा नदीपात्रात मिसळत असल्याने नदीला मिळणाऱया हलात्री नाल्यावर सुरू असलेल्या वाळू उपशामुळे मलप्रभा नदीचे पाणी अत्यंत गढूळ बनले आहे. यामुळे खानापूर शहर तसेच दोन कि. मी. परिसरात येणाऱया गावांना रोगराईचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
मात्र, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष झाले आहे. खानापूर शहराचे सांडपाणी नवीन पूलवजा बंधाऱयाच्या खालच्या बाजूला खड्डय़ात सोडण्यात आले आहे. ते पाणी सरळ मलप्रभा नदीमध्ये मिसळते. पण इतके दिवस त्याचा धोका नवीन पूलवजा बंधारा ते असोगापर्यंतच्या परिसराला झाला नव्हता. पण गेल्या महिन्यात मलप्रभा नदीवरील जळगा बंधाऱयाकडे पाणी अडविण्यात आले आहे. यामुळे मलप्रभा नदीमधील पाण्याची पातळी वाढली असून साहजिकच बॅक वॉटरमुळे सांडपाणीमिश्रित पाण्याची फुग शहरापासून जवळपास दीड कि. मी. अंतरापर्यंत पोहोचली आहे. या बॅक वॉटरमुळे पाणीपुरवठा करणाऱया मलप्रभा नदीतील जॅकवेलकडील पाणीदेखील अत्यंत गढूळ झाले आहे.
पाणी जनावरांनाही अपायकारक
त्यातच मलप्रभा नदीला जोडणाऱया हलात्री नाल्यावर राजरोसपणे वाळू उपसा सुरू झाला आहे. वाळू उपसा करण्यास कोणाचा विरोध नाही. पण वाळू धुवून पाणी पुन्हा हलात्री नाल्यात सोडण्यात येत असल्याने संपूर्ण हलात्री नाला गढूळ झाला आहे. आणि त्या नाल्याचे पाणीदेखील मलप्रभा नदीत मिसळल्याने मलप्रभा नदीचे पाणी अत्यंत गढूळ झाले आहे. पाणी इतके गढूळ झाले आहे की, ते जनावरेदेखील पिण्यास तयार
नाहीत.
वास्तविक जळगा बंधाऱयात पाणी अडविल्यानंतर सांडपाण्यासह पाण्याची फुग शहरापासून जवळपास दीड कि. मी. अंतरापर्यंत पोहोचते. याकरिता जळगा बंधाऱयात पाणी अडविण्यापूर्वीच नवीन पूलवजा बंधाऱयात ठराविक उंचीपर्यंत पाणी अडविल्यास जळगा बंधाऱयातील बॅक वॉटर नवीन पूलवजा बंधाऱयाच्या पुढे पोहचू शकत नाही, पण यावर्षीदेखील अद्याप नवीन पूलवजा बंधाऱयात पाणी अडविण्यात आले नाही. परिणामी सर्वच पाणी अत्यंत गढूळ बनले
आहे. यामुळे आता नवीन पूलवजा बंधाऱयात पाणी अडविले तरी काही काळ पाण्यातील गढूळपणा राहणारच असल्याने मोठी अडचण होणार आहे.