वाहनधारकांची गोची, दोन्ही बाजूचे कठडे नादुरुस्त, राष्ट्रीय महामार्ग खात्याने लक्ष देणे गरजेचे
खानापूर / बातमीदार
खानापूर महामार्गावरील मलप्रभा नदीवरील पुलावर गेल्या तीन वर्षात वारंवार महापुरामुळे पाणी आले. या पाण्याच्या मोठय़ा प्रवाहातून पुलाचे संरक्षक कठडे तुटून गेले. काही ठिकाणचा पुलाचा भाग खचला आहे. त्यामुळे सदरचा पूल अपघाताचे ठिकाण बनून राहिला आहे.
बेळगाव-पणजी व खानापूर-तालगुप्पा या रस्त्यावर खानापूर शहराजवळून मलप्रभा नदी वाहते. या नदीवर 1963 साली सदरचा पूल बांधण्यात आला होता. सुरुवातीला हा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता. पण 1978 साली बेळगाव, खानापूर, लोंढा, अनमोड, पणजी मार्गाला महामार्गाचा दर्जा मिळाल्याने तो बांधकाम खात्याकडून राष्ट्रीय महामार्ग खात्याकडे गेला. पुढील पन्नास वर्षांपर्यंतच्या वाहतुकीचा विचार करून सदर पूल बांधण्यात आला होता. त्यावेळी जास्तीत जास्त 20 ते 30 टनापर्यंतची वाहतूक केली जात होती. पण अलीकडच्या काही वर्षात या रस्त्यावर वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये 50 ते 60 टन वजनाच्या वाहनांचाही समावेश आहे. वाढत्या वाहतुकीमुळे महामार्ग धोकादायक बनला होता. त्यातच 2019, 2020 व 2021 साली मलप्रभा नदीला मोठय़ा प्रमाणात पूर आल्याने पुलावर 10 ते 12 फूट पाणी आले होते. सदरचे पाणी पाच-सहा दिवस टिकून राहिल्याने या पुलाचे कठडे तुटून गेले आहेत. शिवाय पुलाचा काही भाग खचलेला आहे. एवाद्या वेळी वाहनधारकाचे दुर्लक्ष झाल्यास वाहनाचा अनर्थ घडू शकतो. त्यासाठी लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.









