प्रतिनिधी / शाहुवाडी
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तपासणी मोहीम गतिमान केली असून रविवारी येणाऱ्या पर्यटकांची तपासणी केल्याने पर्यटकांच्यात चांगलीच धावपळ उडाली होती. मलकापूर अनुस्कुरा मार्गावर रुग्णवाहिकेतच स्वॅब तपासणी केली जात होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख च्या नेतृत्वाखाली तपासणी मोहीम गतिमान करण्यात आली होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष सतर्कता घेतले आहे. रविवार सुटीच्या दिवशी वाहनांची वर्दळ त्याचबरोबर पर्यटकांची ही वर्दळ जोरातच सुरू होती. या पार्श्वभूमीवर मलकापूर शहरात पोलिस चौकीजवळ त्याच बरोबर मलकापूर अनुस्कुरा मार्गावरील मंगळवार पेठ येथे तपासणी केली जात होती.
स्वॅब चुकवण्यासाठी अनेकांची धावपळ
दरम्यान शहरात स्वॅब काढले जात असल्याची खबर लागल्याने अनेकजन अन्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होते. दुचाकी धारकांच्या सह विशेष करून चार चाकी वाहन धारक अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करत होते. मात्र पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घेऊन स्वॅब घेतले. या मोहिमेत मलकापूर नगरपरिषदेचे माने यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.