दुखापतीचा फटका, सहकारी डावखुरा फलंदाज डॅर्सी शॉर्टला संधी
सिडनी / वृत्तसंस्था
बहरातील ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्ध उर्वरित मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतून बाहेर फेकला गेला आहे. येथील दुसऱया लढतीदरम्यान वॉर्नरला धोंडशिरेची दुखापत उद्भवली. याशिवाय, यजमान संघातील अव्वल गोलंदाज पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाने विश्रांती दिली आहे.
भारतीय संघाविरुद्ध खेळताना नेहमीच कर्दनकाळ ठरत आलेल्या वॉर्नरने पहिल्या 2 वनडे सामन्यात अनुक्रमे 69 व 83 धावांची आतषबाजी केली. पण, रविवारी दुसऱया लढतीत क्षेत्ररक्षण करताना तो स्वतः जायबंदी झाला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 51 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
डावखुरा वॉर्नर दुखापतीवर उपचार व तंदुरुस्ती उपक्रमासाठी यापूर्वीच घरी परतला असून भारताविरुद्ध ऍडलेड येथे होणाऱया पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी पूर्ण तंदुरुस्त होण्याचा त्याचा विचार आहे. उभय संघातील ही महत्त्वाची लढत दि. 17 डिसेंबर रोजी खेळवली जाणार आहे.
‘डेव्हिड वॉर्नर व पॅट कमिन्स हे दोन्ही खेळाडू 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आमच्या संघासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. एकंदरीत हंगामासाठी ते पूर्ण तंदुरुस्त असणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे, आम्ही त्यांना पुरेसा अवधी देत आहोत. विशेषतः विश्व कसोटी चॅम्पियनशिपमधील गुण वसूल करण्यासाठी ही मोहीम विशेष महत्त्वाची असेल’, असे ऑस्ट्रेलियन संघाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगरने नमूद केले.
डॅर्सीला संधी
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आता डेव्हिड वॉर्नरची जागा डावखुरा डॅर्सी शॉर्ट घेईल. डॅर्सी शॉर्ट बिग बॅश लीगच्या दोन आवृत्यांमध्ये सर्वाधिक धावा जमवण्यात यशस्वी ठरला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारी तिसरी व शेवटची वनडे होणार असून त्यानंतर शुक्रवारपासून 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर बहुचर्चित कसोटी मालिकेला प्रारंभ होईल.
ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा व आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधीत्व करणारा पॅट कमिन्स फारसा बहरात राहिलेला नाही. पहिल्या सामन्यात विकेटच्या निकषावर त्याची पाटी कोरी राहिली तर दुसऱया सामन्यात त्याने 67 धावात 3 बळी घेतले. आयसीसीने गुणांकन पद्धतीत बदल केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने (3 मालिकांमध्ये 296 गुण) भारताविरुद्ध (4 सामन्यात 360 गुण) 82.22 टक्यासह विश्व कसोटी गुणतालिकेत आघाडी प्राप्त केली. तीच आघाडी आणखी भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
दुसऱया वनडे सामन्यात साईड स्ट्रेनमुळे खेळू न शकलेला मार्कस स्टोईनिस मात्र संघात कायम राहिला आहे. अष्टपैलू मिशेल मार्श गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत असून तो भारत अ-ऑस्ट्रेलिया अ यांच्या सराव सामन्यात खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले. मार्शला आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती.
गौतम गंभीरची विराट कोहलीवर जळजळीत टीका
जगातील कोणत्याही कर्णधाराने बुमराहला दोन षटकांचा पहिला स्पेल दिला नसता!

जागतिक स्तरावरील एकाही कर्णधाराने जसप्रित बुमराहसारख्या अव्वल गोलंदाजाला दोन षटकांचा पहिला स्पेल देण्याची चूक केली नसती, अशा शब्दात माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरने विराट कोहलीच्या नेतृत्वावर जळजळीत टीका केली. बुमराहकडून फक्त दोन षटके गोलंदाजी करवून घेणे ही घोडचूक आहे. त्याला आणखी कोणतीही उपमा देता येणार नाही, असे गंभीर म्हणाला. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दुसरा वनडे गमावला, त्या पार्श्वभूमीवर गंभीर बोलत होता.
विराटच्या नेतृत्व शैलीवर गौतम गंभीर सातत्याने टीका करत आला असून येथे त्याने विराटची तुलना प्रतिस्पर्धी जलद गोलंदाज जोश हॅझलवूडला सुव्यवस्थित हाताळणाऱया ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचशी केली. ‘जसप्रित बुमराहसारखा जागतिक कीर्तीचा गोलंदाज उपलब्ध असताना त्याला पहिल्या स्पेलमध्ये फक्त दोन षटके दिली जातात, ही चूक नव्हे तर घोडचूक आहे, असे ताशेरे गंभीरने ओढले. प्रत्येकी पाच षटकांचा स्पेल बुमराह व शमी यांना दिला असता तर कदाचित वेगळे चित्र दिसून आले असते. आपण किमान त्यांचे दोन फलंदाज तरी बाद करु शकलो असतो, असे गंभीर पुढे म्हणाला.
ऍरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ हे एकाच ताकदीने तुटून पडत असताना त्यांना बाद करण्याची क्षमता फक्त आणि फक्त बुमराहमध्येच होती आणि विराटने चक्क बुमराहचीच गोलंदाजी दोन षटकात बंद करत अवघ्या क्रिकेट वर्तुळाला आश्चर्याचा व संतापाचा जबरदस्त झटका दिला. दुसरीकडे, फिंचने हॅझलवूडला पहिल्या सामन्यात 6 षटकांचा तर दुसऱया सामन्यात 5 षटकांचा स्पेल दिला होता, याकडेही त्याने लक्ष वेधले.
ऑस्ट्रेलियाने सहावा गोलंदाज म्हणून पहिल्या लढतीत स्टोईनिस व मॅक्सवेल यांचा तर दुसऱया लढतीत हेन्रिक्यूज व मॅक्सवेल यांच्याकडून उत्तम गोलंदाजी करवून घेतली. विराट कोहली हा सर्वोत्तम फलंदाज म्हणून वाखाणला जात असला तरी त्याच्यात व स्टीव्ह स्मिथ यांच्यात फारसा फरक नसल्याचा दावा गंभीरने शेवटी केला.









