जैन धर्माचा गाढा अभ्यास असलेले प्रो. वास्तुपाल पारीख हे 1975-76 च्या दरम्यान कॅनडाहून कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात अध्यापन सेवा देण्याच्या निमित्ताने दोन वर्षांकरिता आले होते. तत्कालीन कुलगुरु बॅ. पी. जी. पाटील यांची संमती, रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रो. जगदाळे यांची दूरदृष्टी आणि अध्यापकांचे आपल्या मूळ गावाविषयीचे आकर्षण यातून हा योग जुळून आला होता. प्रो. पारीख हे राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी. काही काळ पुण्यातील स. प. महाविद्यालयात अध्यापन करून ते पुढे कॅनडातील ‘क्वीन्स’ विद्यापीठात विद्यावाचस्पती अभ्यासाठी गेले आणि त्याच विद्यापीठात ‘सेंद्रीय रसायनशास्त्र’ हा विषय त्यांनी आयुष्यभर शिकवला. अभिमानाची बाब म्हणजे, मराठी भाषिक प्रो. पारीख, ‘ब्रिटीश कोलंबिया एज्युकेशन मिनिस्ट्री’चे मानद सल्लागारही होते. तत्त्वज्ञान, पर्यावरण आणि जगभरातील अहिंसावादी चळवळींविषयी आस्था आणि अभ्यास असणारे प्रो. पारीख दोन वर्षाआधी कॅनडाची राजधानी ‘व्हिक्टोरिया’ शहरात निवर्तले. कर्मवीर अण्णांचे मानसपुत्र बॅ. पी. जी. पाटील, प्रो. जगदाळे ही मंडळीही दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत.
प्रो. पारीखांची आवर्जून आठवण येण्याचे कारण म्हणजे विद्यापीठीय परीक्षांचा गेली सहा महिने सुरू असलेला सावळा-गोंधळ, सांप्रत जीवनातील अवांछित लोकानुनयवादी राजकारण, विद्यापीठातील अनिर्णायकी नेतृत्व आणि शिक्षण क्षेत्रातील धोरण लकवा. परीक्षा हे काही ठरावीक सत्राअंतींचे ऐहिक कर्मकांड नसून, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचे ‘भान’ देणारा तो एक शैक्षणिक अनुभव आहे. शैक्षणिक अनुभवांचे राजकीय परिमार्जनात रुपांतरण झाल्यामुळे विद्यापीठे आता परीक्षांच्या कोरडय़ा उपचारांना सामोरी जाणार आहेत. मूल्यांकनाची सातत्यपूर्ण, सर्वंकष, वस्तुनि÷ता, व्यापकता, उपयोजिता आणि विद्यार्थीकेंद्री ही तत्त्वे अमलात आणून मूल्यांकन प्रक्रिया कितीतरी पटीने पारदर्शी, सहभागी आणि आनंददायी करता येते. जगभरातील चांगल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण आणि अध्ययन प्रक्रिया सातत्याने अद्ययावत केली जात असल्यामुळे तेथे खऱया अर्थाने ‘ज्ञाननिर्मिती’ होते. ज्ञानाधि÷ित अर्थव्यवस्थेत ठसा उमटवणे तर दूरच मात्र किमान पात्रता धारण करण्यासाठीही आपली विद्यापीठे प्रयत्नशील आहेत, हे जाणवत नाही.
प्रो. पारीख ज्या काळात शिवाजी विद्यापीठात आले होते, तो काळ सत्रात परीक्षांचा नव्हता. कुलगुरु आणि विभागप्रमुखांच्या परवानगीने केवळ एम्. एस्स. सी. च्या विद्यार्थ्यांकरिता हा विभाग दर एका महिन्याने सातत्यपूर्ण सर्वंकष अंतर्गत मूल्यांकन चाचणी (कन्टीन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटर्नल इव्हाल्युएशन टेस्ट) घेत असे. निहित वेळेमध्ये तपासलेले चाचणी पेपर सर्व विद्यार्थ्यांना दाखवून त्यावर विद्यार्थ्यांच्या शंकांचे-हरकतींचे समाधान करून त्यांना दिलेल्या गुणांबद्दल-श्रेयांकांबद्दल ‘खुलासा’ दिला जायचा. पुढील सुधारणेसाठी ‘खुली चर्चा’ आणि ‘समुपदेशन’ केले जायचे. एका सत्रातून साधारणत: अशा तीन चाचण्या, शिवाय विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती, इतर उपक्रमांतील सहभागिता यासाठी अंतर्गत गुणांची तरतूद होती. प्रत्येक चाचणीनंतर आपल्याला पूर्वीपेक्षा चांगली श्रेणी मिळवायची असेल तर अधिक मेहनत करावी लागेल असा निश्चय विद्यार्थी बाळगीत. अंतर्गत मूल्यांकनांच्या ज्या तीन चाचण्या होत असत त्यापैकी सर्वाधिक गुण असणाऱया दोन चाचण्या अंतिम गुणांसाठी ग्राहय़ धरल्या जात असत. सर्व विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण पारदर्शकतेने सूचना फलकावरही लावले जात. अर्थात, या सातत्यपूर्ण सर्वंकष अंतर्गत मूल्यांकन पद्धतीमुळे प्राध्यापकांना आधीपेक्षा थोडे जास्त काम पडायचे. विद्यार्थ्यांसोबत सातत्याने संवाद ठेवून विद्यार्थ्यांच्या ‘असाइन्मेन्ट’ आणि ‘उत्तर पत्रिका’ सांभाळण्याचेही काम वाढलेले होते.
शिवाजी विद्यापीठात प्रो. पारीख सरांच्या काळात फक्त एम्. एस्स. सी.च्या वर्गाकरिता राबवली गेलेली ही अंतर्गत मूल्यांकन पद्धती सरांच्या बर्हिगमनासोबत बर्हिगत झाली. आपल्या देशातील अनेक व्यवस्था या व्यक्तिकेंद्रीच असतात. अधिकाधिक लोकांना कामाला लावणाऱया व्यवस्था या वरिष्ठ व्यक्ती बदलल्यावर लगोलग पूर्वपदावर येतात. प्रो. पारीखांचा विद्यार्थीदशेत सहवास लाभलेले प्रो. माणिकराव साळुंखे 2009 मध्ये राजस्थान केंद्रीय विद्यापीठाला संस्थापक कुलगुरु म्हणून लाभले. त्यांच्या काळात ही सहभागी आणि पारदर्शी मूल्यांकन प्रक्रिया उत्तमरित्या प्रतिष्ठपित झाली. त्यांच्या कार्यकाळानंतर या पद्धतीचा आशय पातळ झाला मात्र स्वरुप आणि व्यवस्था टिकून आहे. भारतातील अनेक सुप्रतित विद्यापीठे आणि स्वायत्त संस्थांमध्येही निम्म्याअधिक गुणांची सातत्यपूर्ण अंतर्गत मूल्यांकन प्रक्रिया पहावयास मिळते. अशा संस्थांमध्ये अंतिम वर्ष परीक्षांचा मुद्दा जिकिरीचा झालेला नव्हता. त्यांच्या परीक्षा या निहीत वेळेतच झाल्या. आधी ठरलेल्या प्रारुपाप्रमाणेच झाल्या. फक्त ऑनलाईन आणि विद्यार्थ्यांच्या घरबसल्या झाल्या इतकेच.
बऱयाच खडाजंगीनंतर आणि न्यायालयीन हस्तक्षेपानंतर महाराष्ट्रात आता अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा निव्वळ ‘फार्स’ ठरणार आहेत, याची चिन्हे आत्ताच उमटत आहेत. महाराष्ट्रातील नानाविध विद्यापीठात अंतर्गत-बर्हिगत गुणांचे प्रारुप 20-80, 30-70, 40-60 आणि 50-50 असे आहे. या वषी अंतिम सत्राच्या वर्षाच्या परीक्षा या फक्त पन्नास वा साठ मार्कांच्या आणि बहुपर्यायी निवड प्रश्न स्वरुपाच्या होणार आहेत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांला वीस गुणांच्या अंतर्गत परीक्षेत चौदापेक्षा जास्त गुण असल्यास तो अंतर्गत पन्नास गुणांच्या टाळेबंदीत आधीच पास झालेला आहे. उर्वरित पन्नास गुणांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेला उपस्थित राहण्याची औपचारिकता बाळगावी लागणार आहे. बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरुपही 13 मार्चपर्यंत संपन्न झालेल्या अध्यापनावर आधारित असणार आहे. हा निर्णय अगदी शेवटच्या वेळी घेतला गेलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात या प्रश्नपत्रिकांच्या स्वरुपाबाबत असंतोष आहे.
अनेक ठिकाणी विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी कुलगुरुंना भेटून आपापले निवेदन देत आहेत. प्रश्नपत्रिकांचे प्रारुप आणि नमुनासंच काही विद्यापीठांच्या संकेतस्थळावर लवकर दिसावे अशी आशा बाळगूया. वेगवेगळय़ा विद्याशाखांचे स्वरुप वेगवेगळे आहे. त्यांना एकाच प्रश्नपत्रिका प्रारुपाच्या कोंदणात बसविणे हा शिक्षणाचा कडेलोट आहे. संबंधित अभ्यास मंडळे, प्राधिकरणे आणि मुख्यत्वे विद्यार्थ्यांनाच विश्वासात न घेता अचानकपणे या बहुपर्यायी प्रश्ननिवड परीक्षेने सर्वांसमोरच आव्हान उभे केले आहे. गेले चार-पाच महिने याबाबत कोणत्याही संभाव्य परीक्षा प्रारुपाबद्दल कोणतीच चर्चा वा संवाद विद्यापीठ पातळीवर न झाल्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रात यावेळी गोंधळाचे वातावरण आहे. शासनाने कुलगुरुंवर, कुलगुरुंनी प्राचार्यांवर, प्राचार्यांनी प्राध्यापकांवर आपली जबाबदारी ढकलल्यामुळे शिक्षणक्षेत्रात मोठी अनागोंदी निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन परीक्षांसाठी संमती अर्ज मिळवला जात आहे, मात्र त्याचे स्वरुप पूर्णत: ऐच्छिक आहे असेही नाही.
कोरोना, हे नि:संशय भारतासमोरीलच नव्हे तर समस्त वैश्विक अर्थव्यवस्थेपुढील आव्हान आहे. राष्ट्राच्या जीवनात अशी आव्हाने उद्भवल्यावर देशांतर्गत यंत्रणांनी सज्जता अंगिकारून, पूर्वीपेक्षा अधिक जोमाने काम करून समाजजीवनाला आत्मविश्वास द्यायचा असतो. आपल्या शिक्षणव्यवस्थेने राष्ट्र उभारणीच्या निकषावर उत्तीर्ण होण्यासाठी प्रो. वास्तुपाल पारीखांसारख्या ऐतद्देशीय शिक्षणतज्ञांनी दर्शविलेल्या वस्तुपाठाचे स्मरण करायला हवे.
डॉ. जगदीश जाधव