मनपाच्या आरोग्य विभागातील प्रकार : कंत्राटदाराला मनपाचे ओळखपत्रही बहाल
प्रतिनिधी / बेळगाव
मनपाला लागणाऱया साहित्याचा पुरवठा करण्यासह शहरातील विकासकामे राबविण्यासाठी मनपाकडून निविदा काढण्यात येतात. पण सध्या कोरोनामुळे लागणारे साहित्य निविदाविना खरेदी करण्यात येत असून केवळ मर्जीतील एकाच कंत्राटदाराला काम दिले आहे. सदर कंत्राटदाराला मनपाचे ओळखपत्र आणि कर्मचाऱयांना देण्यात येणारे जॅकेट देण्यात आल्याने मनपाबाह्य नागरिकांना ओळखपत्र देता येते का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.
शहराची स्वच्छता करणे, कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात मनपाचे कर्मचारी व्यस्त आहेत. क्वारंटाईन नागरिकांची माहिती घेणे, लॉकडाऊनची अंमलबजावणी करणे अशा जबाबदाऱया मनपा कर्मचाऱयांवर सोपविल्या आहेत. मात्र अशा वेळी मास्क, जॅकेट, सॅनिटायझर, पीपीई किट आदींसह विविध साहित्याची गरज भासत आहे. सदर साहित्य निविदाविना थेट खरेदी करण्याचा प्रकार सुरू आहे. मनपाला लागणारे साहित्य किंवा शहरात राबविण्यात येणाऱया सर्व कामांकरिता निविदा काढण्यात येतात. पण सध्या नैसर्गिक आपत्तीचे कारण देऊन निविदाविना थेट साहित्य खरेदी करण्यात येत आहे. वास्तविक शॉर्ट टर्म निविदा काढून साहित्य खरेदी करता येऊ शकते. पण मनपाच्या अधिकाऱयांनी मर्जीतील कंत्राटदाराला काम दिल्याची चर्चा आहे. लागणारे साहित्य पुरविण्याचे कंत्राट एकाच कंत्राटदाराला दिल्याने कंत्राटदाराची मनपा कार्यालयात मनमानी सुरू आहे. तो अधिकाऱयांना उद्धटपणे बोलत असल्याची टीका होत आहे. त्याच्या विरोधात गेल्यास वरिष्ठांकडे तक्रार किंवा कर्मचाऱयांच्या विरोधात तो वृत्तपत्रांना माहिती पुरवितो. त्यामुळे मर्जीतील कंत्राटदाराला मनपा अधिकाऱयांनी महापालिकेचे ओळखपत्र देऊ केले आहे. कर्मचाऱयांना देण्यात येणारे जॅकेटही कंत्राटदाराला दिले आहे. कंत्राटदाराला मनपाचे ओळखपत्र देता येऊ शकते का? ओळखपत्राचा दुरुपयोग झाल्यास जबाबदार कोण, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. मर्जीतील कंत्राटदाराच्या अरेरावीला आरोग्य विभागातील कर्मचारी वैतागल्याची चर्चा आहे.









