प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, पुणे) संस्थेबाबत राज्य सरकारकडून घेतले जात असलेल्या निर्णयावर खासदार संभाजीराजे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाची दिशाभूल करून सारथी बंद करण्याचा सरकारचा डाव तर नाही ना? असा संतप्त सवाल उपस्थित करत संभाजीराजे यांनी सारथी वाचविण्यासाठी आता संपूर्ण मराठा समाजाने एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे.
मराठा समाजाने एकजुटीने संघर्ष केल्यानंतर सारथी संस्थेची निर्मिती झाली होती. या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील युवक, युवतींना शैक्षणिक प्रगतीसाठी निधी उपलब्ध झाला होता. प्रशिक्षण व इतर सुविधा मिळाल्याने मराठा युवक युवतींना प्रगतीसाठी आधार लाभला होता. केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसह संशोधन, शिक्षणातील इतर पदवीसाठी शिष्यवृत्ती, प्रशिक्षण मिळत असल्याने मराठा युवक, युवती प्रगतीची पावले चालत होते, पण गेल्या काही महिन्यांपासून सरकारच्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून सारथीबाबत घेण्यात आलेले निर्णय मराठा युवक, युवतींना अडचणीत आणणारे ठरत आहेत.
केवळ एखाद्या अधिकाऱयावर आरोप झाले म्हणजे सर्व संस्था चुकीची आहे, असा अर्थ काढणे योग्य नाही. सारथीच्या स्वायत्ततेबाबत 11 जानेवारीला पुण्यात युपीएससी, एमपीएससीचे विद्यार्थी, तारादूत यांच्यासह आम्ही आंदोलन केले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे भेटीस आले. त्यावेळी फोनवरून झालेल्या संवाद मुख्यमंत्री ठाकरे यांनी सारथीची स्वायत्तता कायम राखण्याचे आश्वासन दिले. पण त्यानंतर किती आश्वासने पूर्ण झाली?, उलट सारथीचे पंख कापण्याचे काम सातत्याने सुरू आहे. त्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री दुटप्पीपणाची भूमिका घेत आहेत. त्यांनी चौकशीचे आदेश दिले पण तोही फार्स ठरला आहे. त्यातून काय निष्पन्न झाले हे देखील ते जाहीर करत नाहीत. त्यावरून त्यांनी दुटप्पीपणाची भूमिका दिसते.
मराठा समाजाला एकत्रित येण्याचे आवाहन
सारथीच्या बाबत सुरू असलेला प्रकार पाहता नजीकच्या काळात राज्यातील सर्व मराठा समाजातील युवक, युवतींसह सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. मराठा समाजाने आरक्षणसाठी एकजुटीने लढा दिला. सारथी संस्था मोडण्याचा डाव उद्धवस्त करण्यासाठी मराठय़ांनी एकजुटीने पुढे यावे. शाहू महाराजांच्या नावाने असणारी संस्था वाचविण्याची आणि मराठा समाजातील युवक, युवतींचे भविष्य घडविण्यासाठी सारथीची स्वायत्तता आवश्यक आहे, त्यासाठी मराठय़ांनो एकत्रित या, असे आवाहनही संभाजीराजे यांनी केले.