मराठी भाषादिनानिमित्त आरपीडी महाविद्यालयात संमेलनाचे आयोजित
प्रतिनिधी / बेळगाव
स्त्रिच्या जीवनातील चढ-उतारांनी खिळवून ठेवणाऱया नाटय़अभिवाचन नामवंत कवींच्या कवितांचे अफलातून सादरीकरण, अभिजात कथा-कथनाचा वारसा सांगणारे कथा-कथन, ठेका धरायला लावणारी नृत्ये अशा कार्यक्रमांनी आरपीडी कॉलेज आयोजित ‘मराठी साहित्य व संस्कृती जागर’ हे एकदिवसीय संमेलन यशस्वी ठरले. मराठी भाषादिनानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
प्रारंभी प्राचार्य शोभा नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. एसकेई सोसायटीचे अध्यक्ष सेवंतीलाल शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यवस्थापन मंडळाच्या उपाध्यक्षा बिंबा नाडकर्णी यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. मराठी विभाग नाटय़ प्रशिक्षण वर्गाच्या प्रशिक्षणार्थींनी ‘लख उजेडातलं मोकट वळू’ या नाटय़ाचे अभिवाचन केले. प्रदीप शिवगड लिखित या नाटय़ाच्या सादरीकरणाने सर्वांना अंतर्मुख केले.
दुसऱया सत्रात माजी विद्यार्थी महादेव खोत यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. वीणा बिर्जे, वैष्णवी पाटील, संयुक्ता गुंडपकर, माधुरी बागवे यांनी यामध्ये सहभाग घेतला. दुसऱया सत्रात आशा रतनजी यांचे बहारदार कथा-कथन झाले. मुग्धा कुलकर्णी यांनी शतदा प्रेम करावे ही कथा सादर केली. यानंतरच्या सत्रात श्रेया सव्वाशेरी आणि समूह यांची लावणी करुना पिंगट, कल्याण बसुर्तेकर, रोहिणी पाटील आणि सहकारी यांनी गीते सादर केली. वीणा बिर्जे, प्रा. सरोजीनी चौगुले, प्रा. परसू गावडे यांनी सूत्रसंचालन केले.









