आक्षेप नोंदविण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी : म. ए. युवा समितीचे मनपा आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्कालिक मतदारयाद्या केवळ कन्नड भाषेत प्रसिद्ध करून आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारयाद्यांच्या प्रसिद्धी प्रक्रियेवरच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने आक्षेप घेतला आहे. प्रथम मराठी मतदारयाद्या प्रसिद्ध कराव्यात, त्यानंतर आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ द्यावा. तोपर्यंत आक्षेप नोंदणी घेऊ नये, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना देण्यात आले.
वॉर्ड पुनर्रचना, आरक्षण आणि महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱया सरकारी प्रक्रियेत मराठी भाषेला डावलण्यात आले आहे. वास्तविक पाहता शहरात मराठी भाषिकांचे वर्चस्व अधिक असून मराठी व कानडी अशा दोन्ही भाषांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, अशी केंदीय भाषिक आयोगाने सूचना केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाकडून कानडीकरणाचा वरवंटा फिरविला जात आहे. मतदारयाद्या केवळ कन्नड भाषेत प्रसिद्ध करून आक्षेप नोंदविण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या या धोरणाला म. ए. युवा समितीने आक्षेप घेतला आहे. मतदारयाद्या वेळेत मिळत नाहीत. दि. 29 जूनपर्यंत मतदारयाद्या उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. पण दि. 1 जुलैपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केवळ कन्नड भाषेत मतदारयाद्या प्रसिद्ध करणे चुकीचे असून शहरातील बहुसंख्य मराठी जनतेला मराठी भाषेतून मतदारयाद्या उपलब्ध करून द्याव्यात, त्यानंतर आक्षेप नेंदवून घ्यावेत, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
तसेच मराठीत मतदारयाद्या प्रसिद्ध केल्यानंतरच आक्षेप नोंदविण्याची प्रक्रिया राबविण्यात यावी, तोपर्यंत ही प्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. मराठी मतदारयाद्यादेखील पुरविल्या जातील, तसेच आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत वाढीबाबतही विचार केला जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिले.
यावेळी निवेदन देताना म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, श्रीकांत कदम, सचिन कळवेकर, वासू सामजी, सिद्धार्थ चौगुले, भागोजी पाटील, जोतिबा पाटील, विक्रांत लाड, निखिल पाटील आदी उपस्थित होते.









