मध्यवर्ती म. ए. समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहरासह जिल्हय़ात 15 टक्क्मयांहून अधिक मराठी भाषिक असून सर्व सरकारी कागदपत्रे, परिपत्रके आणि सातबारा उतारे मराठी भाषेतून देण्यात यावेत तसेच सरकारी कार्यालय, बस आणि रस्त्यांशेजारी असलेले नामफलक मराठी भाषेतून लिहिण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले.
कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्यासाठी मराठी भाषिकांवर अन्याय करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. सर्व सरकारी कार्यालयांवरील फलक, विविध कागदपत्रे आणि परिपत्रके केवळ कानडी भाषेतून देण्याचा सपाटा प्रशासनाने चालविला आहे. महापालिका कार्यालयासमोरील तिन्ही भाषेतील फलक हटवून केवळ कानडी भाषेतील फलक लावण्यात आला आहे.
तसेच महापालिकेसमोर अनधिकृत लाल-पिवळा ध्वज लावून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार प्रशासनाने चालविला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांना वेळोवेळी निवेदने देवूनही मराठी भाषेतून परिपत्रके देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच सरकारी कार्यालयांवर आणि विविध चौकांत मराठी भाषेतून नामफलक लिहिण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेण्यात आली नसल्याने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
धर्मवीर संभाजी चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चाला परवानगी देण्यात आल्यानंतर कॉलेज रोड मार्गे पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिल्यानंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अनुपस्थितीत अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी निवेदन स्वीकारले. यापूर्वी कन्नडसह मराठी अशा दोन्ही भाषेतून सरकारी कार्यालये, बस, हॉस्पिटल, शाळा-कॉलेज आणि रस्त्यांशेजारील नामफलक लावण्यात येत होते. पण अलिकडे केवळ कन्नड आणि इंग्रजी अशा भाषेतून नामफलक लावण्यात येत आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांची गैरसोय होत असून बेळगाव शहरात 15 टक्क्मयांहून मराठी भाषिक असल्याने भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनुसार मराठी भाषेतून फलक व परिपत्रके देण्यात यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ आणि महापालिकासमोर काही कन्नड संघटनांनी लाल-पिवळा ध्वज लावला असून सदर फलक हटविण्यात यावा, अशी मागणी युवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आली होती. पण याबाबत प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. याबाबत तातडीने कारवाई करुन ध्वज हटविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. मराठी भाषेतून फलक लावण्यासह विविध कागदपत्रे मराठी भाषेतून देण्यासाठी संबंधित अधिकाऱयांना सूचना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे पदाधिकारी, शहर व तालुका म. ए. समितीचे पदाधिकारी तसेच युवा म. ए. समितीचे पदाधिकारी, म. ए. समिती महिला आघाडी, खानापूर म. ए. समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मोठय़ा संख्येने मराठी नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.









