महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव महानगरपालिका ही सीमालढय़ाचा केंद्रबिंदू असून आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांचे वर्चस्व राहिलेले आहे. यावेळी सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येऊन एकदिलाने या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देणे गरजेचे आहे, असे आवाहन महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून गेल्या 65 वर्षांपासून नेहमीच अन्याय, अत्याचार होत आहेत. मराठी साहित्य संमलेनांना परवानगी नाकारून महाराष्ट्रातून येणाऱया साहित्यिकांना प्रवेशबंदी केली जाते. यावर कहर म्हणजे मराठी भाषिकांची अस्मिता चिरडण्यासाठी काही कानडी संघटनांना पुढे करून महाराष्ट्राचे व अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो. असे एक ना अनेक अन्यायकारक प्रकार सीमाभागात सुरूच आहेत. काहीही करून बेळगाव व सीमाभागातील मराठी भाषिकांना हद्दपार करणे हाच कर्नाटक सरकारचा अजेंडा आहे, असे निदर्शनास येत आहे. मराठी शाळा बंद पाडून त्या ठिकाणी कानडी शाळा सुरू करणे, कानडी भाषेत बोलण्याची सक्ती करणे, या अन्यायाविरुद्ध आंदोलन करणाऱया मराठी युवकांवर गंभीर गुन्हे दाखल करणे, मराठी भाषिकांच्या दुकानांवरील मराठी फलकांवर दगडफेक करणे व मराठी भाषिक दुकानदारांवर अन्याय करणे आदी गोष्टी दडपशाहीमार्गाने केल्या जातात.
मराठी अस्मितेवर आघात करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेसमोर अनधिकृतरीत्या लाल-पिवळा ध्वज फडकविण्यात आला आहे. एकूणच भारतीय संविधानाने सर्वसामान्य नागरिकांना बहाल केलेले मूलभूत हक्क व स्वातंत्र्यापासून सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांना वंचित राहावे लागत आहे.
या सर्व गंभीर आणि संविधानविरोधी घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच बेळगावमधील मराठी भाषिकांनी यापूर्वी आंदोलनासाठी ज्या प्रकारे एकजुटीने सामना केला, त्याचप्रकारे बेळगाव महानगरपालिकेतील मराठी भाषिकांची सत्ता स्थापन होणे काळाची गरज बनली आहे. सीमाप्रश्न सध्या अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी महानगरपालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता असणे गरजेचे बनले आहे. यादृष्टीने महाराष्ट्र एकीकरण समिती प्रयत्नशील असून, समितीचा संकल्प यशस्वी करण्यासाठी मराठी भाषिकांनी जास्तीत जास्त समितीचे उमेदवार देऊन सर्व उमेदवार विजयी होतील, यासाठी प्रयत्न करावेत. कर्नाटक सरकारच्या सर्व हालचालींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. महाराष्ट्र सरकार सदैव सीमावासियांच्या पाठीशी राहिलेले आहे आणि सदैव राहील, अशी सीमावासियांना मी ग्वाही देत आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.









