अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 2 एप्रिल 2022, सकाळी 11.10
● दोन वर्षानंतर गुढी पाडवा सणाला उत्साह
● जिल्ह्यात नव्याने केवळ कराड तालुक्यात तीन जण बाधित
● सर्वसामान्य जनतेने मानले सरकारचे आभार
● पॉझिटिव्हिटी 0.79 वर
सातारा / प्रतिनिधी :
तब्बल दोन वर्षे कोरोना महामारीच्या संकटात अवघा महाराष्ट्र सापडला होता. सातारा जिल्हा कोरोनाच्या खाईत होता. त्यामुळे कडक निर्बंध लागू केले होते. महाराष्ट्रात कोरोनाची नव्याने होणारी बाधित वाढ अत्यल्प झाल्याने आज संपुर्ण राज्य निर्बंधमुक्त करण्यात आले आहे. मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र कोरोनाच्या निर्बंधातुन मुक्त झाला असून गुढी पाडव्याचा सण अभूतपूर्व उत्साहात साजरा होत आहे. सातारा जिल्ह्यात ही अनेक ठिकाणी गुढी पाडव्याच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील केवळ 3 जण बाधित आढळून आले असून 381 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 0.79 वर आलेला आहे.
कोरोनामुक्तीची उभारली गुढी
कोरोना महामारीने गेली दोन वर्षे चांगले पछाडले होते. जिल्ह्यातील अनेकांनी या दोन वर्षांच्या काळात हालअपेष्टा सहन केल्या. अनेकांच्या घरातील करती माणसे कोरोनाने हिरावून नेली. अनेकांचे रोजगार बुडाले. अनेक जण उपाशी मेले त्याची कुठे वाच्यता झाली नसावी. अशा या कोरोनाचा महाभयंकर काळ प्रत्येकाला एका हॉरर चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे आठवला तरी अंगावर अजून ही शहारे येतात. असा हा दोन वर्षातला काळ उलटल्यानंतर पारंपरिक पद्धतीने गुढी पाडवा राज्यभरात गावोगावी उत्साहात साजरा होत आहे. प्रत्येक जण एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा करत आहेत. काही ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. त्यामध्ये मोठा उत्साह पहायला मिळत होता.
जिल्ह्यात नव्याने 3 जण बाधित
जिल्ह्यात नव्याने होणारी बाधित वाढ आता पूर्णपणे थांबली आहे. दिवसाआड जिल्ह्यात शून्य बाधित आढळून येत आहेत. शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात 381 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यात कराड तालुक्यातील 3 जण बाधित आढळून आले. जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी 0.79 असून आता पर्यत जिल्ह्यातील बाधित 2 लाख 79 हजार203 झाले आहेत. तर कोरोना मुक्ती आतापर्यंत 2 लाख 71 हजार 813 जणांची झालेली आहे. मृत्यू 6683 जणांचा झालेला आहे. आतापर्यंत स्वाब तपासणी 25 लाख 72 हजार 690 जणांची झालेली आहे. जिल्हा कोरोनामुक्त झालेला आहे.
निर्बध हटवल्याने सरकारचे सामान्य जनतेकडून आभार
कोरोना रोखण्यासाठी सरकारने कडक नियम लावले होते. त्या नियमामुळे घरातील एखादी वस्तू जर संपली असेल तर ती आणण्यासाठी बाहेर गेलेल्यावर आणि गमतीने बाहेर गेलेल्यावर कडक कारवाई झाली होती. त्या काळात काहींनी लुटालुट ही केल्याचे अनेकांनी अनुभव घेतला. आता मात्र नव्या मराठी वर्षात कोरोनाचे निर्बंध हटवल्याने सर्वसामान्य जनतेतून सरकारचे आभार मानले जात आहेत.
शनिवारी
नमुने-381
बाधित-03
शनिवारपर्यंत
नमुने-25,72,690
बाधित- 2,79,203
मृत्यू-6,683
मुक्त-2,71,813









