नगरगाव, सावर्डे, म्हाऊस सरपंच, पचांशी राज्यपालांनी साधला संवाद : गोवा संपूर्ण यात्रेंतर्गत राज्यातील सर्व भागांत भेटी देणार

प्रतिनिधी /वाळपई
गोव्यात वापरात असलेल्या कोकणी व मराठी या दोन्ही भाषांनी देशाला महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. येणाऱया काळात या दोन्ही भाषांच्या माध्यमातून संवाद साधण्याचा निश्चित प्रयत्न करण्यात येणार आहे. 21 व्या शतकात आपला देश सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे गेला पाहिजे. यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने वेगवेगळय़ा प्रकारे सहकार्य द्यावे, असे आवाहन राज्यपाल पिल्लई यांनी केले आहे.
नगरगाव येथील सरकारी माध्यमिक विद्यालयात नगरगाव, सावर्डे व म्हाऊस या तीन पंचायत क्षेत्रातील सरपंच, पंच यांच्याशी राज्यपालांनी संवाद साधला. यावेळी पंचायतीच्या माध्यमातून आतापर्यंत झालेल्या विकास कामांबाबत त्यांनी कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर यांच्या पत्नी सौ. रिठा, अधिकारी मिहीर वर्धन, उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती बासू, सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांची उपस्थिती होती.
गोव्याबाबत जागतिक स्तरावर विशेष आकर्षण!
गोवा राज्य जरी छोटे असले तरीसुद्धा या प्रदेशांमध्ये असलेली जैविक संपत्ती जंगल संपत्ती, समुद्रकिनारे देव-देवतांची मंदिरे, चर्च, मशिदी यांच्या माध्यमातून गोव्याबाबत जागतिक स्तरावर विशेष प्रकारचे आकर्षण निर्माण झाले आहे. जागतिक स्तरावर पर्यटनदृष्टय़ा गोवा हा प्रथम क्रमांकाचा प्रदेश मानला जातो. यामुळे मोठय़ा प्रमाणात पर्यटक या ठिकाणी ताण तणाव घालविण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी येतात, राज्यपाल श्रीधरन पिल्लई यावेळी म्हणाले. केरळ व गोवा यामध्ये अनेकदृष्टय़ा साम्य आहे. आपण केरळ राज्यातील असल्याने याबाबत आपल्याला विशेष आकर्षण आहे. म्हणूनच ‘गोवा संपूर्ण यात्रा’ या कार्यक्रमाचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. आगामी काळात गोव्यातील संपूर्ण भागात या यात्रेच्या माध्यमातून भेट देणार असून सर्व भागातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
समस्या सरकारसमोर मांडणार!
ही यात्रा करताना आपल्यासमोर येणाऱया अनेक समस्यांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिने निश्चित प्रमाणात प्रयत्न करण्यात येतील. यासाठी पुढील काळात नवीन सरकारकडे अडचणीत मांडण्यात येणार आहेत. त्या निकालात काढण्याबाबत विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी यावेळी दिले. गुन्हेगारीचे प्रमाण गोव्यामध्ये कमी होऊ लागले आहे. ही खरोखरच चांगली बाब आहे. ग्रामीण भागातील जनता समाधानी राहण्यासाठी आपले पूर्ण सहकार्य राहणार. विविध उपक्रम राबविण्यासाठी आपण सरकारला निर्देश देणार, असे यावेळी राज्यपालांनी स्पष्ट केले.
कोरोना संकटातही देशाची चौफेर प्रगती
कोरानामुळे अनेक देश पीछाडीवर आलेले आहेत. मात्र भारत देशाने कोरोना काळात सुद्धा चौफेर विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. यामुळे सरकारसह जनतेचे आभार व्यक्त करणे ही खरी गरज असल्याचे मत यावेळी राज्यपालांनी व्यक्त केले.
सरपंचाची विकासगाथा व समस्याचा पाढा
नगरगाव, सावर्डे व म्हाऊस पंचायतीच्या सरपंचानी यावेळी पंचायतीच्या कार्य व विकासकामांची यादी सादर केली. तर अनेक सरपंचानी प्रत्येक पंचायतीमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या समस्या राज्यपालांचे समोर मांडल्या. नगरगाव सरपंच प्रशांत मराठे यांनी विद्यमान पंचायत मंडळाने नेत्रदीपक विकासाची कामगिरी केली असून येणाऱया काळात वेगवेगळय़ा विकासाच्या माध्यमातून पंचायतींना अग्रकमी करण्याच्या दृष्टिकनातून प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन राज्यपालांनी दिले. सावर्डे पंचायतीचे सरपंच अशोक च्यारी यांनी यावेळी पंचायत इमारत उभारणीच्या कामात अभयारण्यांची अडचण समोर येत असून यामध्ये गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती राज्यपालांना केली. यावेळी तालुक्मयाचे मामलेदार कौशिक देसाई गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे व इतरांची उपस्थिती होती. म्हाऊसच्या सरपंच वंदना गावस यांनी पंचायत क्षेत्रात निर्माण झालेली नेटवर्क समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या सोविण्यासाठी करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे अशी व्यथा मांडली. सुरुवातीस नगरगाव बालभवन केंद्राच्या मुलांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ प्रदान करू स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरुवात पारंपारिक समय प्रज्वलीत करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरगाव सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका मेधा प्रभुदंसाई यांनी केली तर शिक्षक बाबल्यानंद झोरे यांनी आभार मानले.









