पत्रकार संजय राऊत यांचे प्रतिपादन, बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे उद्घाटन
प्रतिनिधी/ बेळगाव
मुंबईसह महाराष्ट्रात कानडी भाषिक नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. आम्ही कन्नड शाळांना अनुदान देऊन त्या बंद पडणार नाहीत, याची काळजी घेत आहोत. गिरीश कर्नाड, पं. भीमसेन जोशी, गंगुबाई हनगल यांनी महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांची संस्कृती व कला समृद्ध केल्या आहेत. मराठी व कन्नड या भाषा भगिनी आहेत. ज्या प्रकारे कन्नड भाषिक लोकांना महाराष्ट्रात त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेतो. तशीच काळजी येथील सरकारने मराठी भाषिकांची घ्यावी. येथील मराठी संस्कृती, कला, साहित्य जपण्यासाठी प्रयत्न करावेत, असे विचार दैनिक सामना, मुंबईचे कार्यकारी संपादक व शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना खासदार संजय राऊत बोलत होते. निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे व पत्रकार नरेंद्र कोठेकर (मुंबई) यांनी राऊत यांची प्रकट मुलाखत घेतली. कॅम्प येथील गोगटे रंगमंदिर (स्कूल ऑफ कल्चर) येथे हा कार्यक्रम पार पडला.
आमचे हिंदुत्व हे गाडगेबाबांचे हिंदुत्व
बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाची व्याख्या काहीशी वेगळी होती. ज्या प्रकारे गाडगेबाबांनी दीनदलितांची सेवा केली, त्यांना न्याय मिळवून दिला, त्याप्रकारचे हे आमचे हिंदुत्व आहे. सरकार चालविताना कोणत्याही धर्माचा वापर करू नये. कारण धर्माचा आधार घेऊन सरकार स्थापन झाल्यास पाकिस्तान होण्यास वेळ लागणार नाही, अशी खोचक कोपरखळी राऊतांनी लगावली.
बाळासाहेब आमचे दैवत
आज जो संजय राऊत तुम्ही पाहात आहात, तो फक्त आणि फक्त हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळेच. बाळासाहेबांचा माझ्या संपूर्ण जीवनावर प्रभाव पडला. त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती मी अंगीकारत गेलो. बाळासाहेब दररोज 22 वृत्तपत्र वाचत असत. त्यामुळे त्यांचे ज्ञान हे अफाट होते. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे राजकीय मतभेद असतील, पण कौटुंबिक जिव्हाळा मात्र आजही टिकून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगावकरांनी मराठी भाषेची मशाल तेवत ठेवली
फक्त बेळगावमध्येच नाहीतर महाराष्ट्रातही मराठी भाषेसाठीचा लढा आम्हाला द्यावा लागत आहे. त्यामुळे अशा वातावरणातही बेळगावमध्ये व्याख्यानमाला होते, हे वाखाणण्याजोगे आहे. मराठी भाषेची मशाल तेवत ठेवली ती बेळगावकरांनी. त्यांच्याकडूनच महाराष्ट्राला मराठीची प्रेरणा मिळत आहे. एक उत्तम संसदपटू असलेले बॅ. नाथ पै यांनी ज्या ध्येयासाठी संपूर्ण आयुष्य वेचले त्या भूमीतच त्यांना वीरमरण आल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी पत्रकार एका ध्येयाने काम करत होते. परंतु सध्या पत्रकारितेवर निर्बंध येत आहेत, अशी आरोळी दिली जाते. पण ज्यांना आपली भूमिका रोखठोक मांडायची असेल तर ते मांडू शकतात. त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची बंधने येत नाहीत. ज्यांचे राजकारण्यांशी हितसंबंध नाहीत ती वृत्तपत्र आपली भूमिका रोखठोक पद्धतीने मांडत आहेत, असे त्यांनी सांगितले.
मंत्र्यांची अडवणूक चुकीचीच
हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या राजेंद्र यड्रावकर यांची करण्यात आलेली अडवणूक चुकीची होती. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार कोणीही अभिवादन करू शकतो. कर्नाटकातील मंत्री जर मुंबईला अभिवादन करण्यासाठी आले तर आम्ही सन्मानाने त्यांचे स्वागत करू, असे राऊत यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेताजी जाधव यांनी केले. ज्ये÷ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष गोविंद राऊत यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक केले. ऍड. आय. जी. मुचंडी यांनी आभार मानले.
पुरस्कारांचे वितरण
तरुण भारतचे वार्ताहर एन. ओ. चौगुले, कन्नडम्माचे वार्ताहर सी. ए. इटनाळमठ, केएलई वेणुध्वनीच्या मनीषा सन्ननाईक, विजयवाणीच्या प्रतिनिधी जयश्री अब्बीगेरी यांना पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गुणवंत विद्यार्थी राणी हिरोजी, तेजस्विनी कांबळे, बाबासाहेब भंडारी यांना गौरविण्यात आले.
चौकट करणे
मी दुवा म्हणून काम करीन…
ज्या-ज्या वेळी सीमावासियांवर अन्याय झाला त्या-त्या वेळी शिवसेना धावून आली आहे. सीमावासियांवर अन्याय होणार नाही याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यातील दुवा म्हणून मी काम करीन. त्यामुळे या माझ्या बेळगावात पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन……. अशी घोषणा खासदार राऊत यांनी करताच एकच हशा पिकला.









