प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा सेवा संघाचे कोल्हापूर जिल्ह्याचे पहिले अध्यक्ष, सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक ऍड. वसंतराव लक्ष्मणराव पवार वय 90, रा. तात्यासाहेब हौसिंग सोसायटी, किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा ऍड. संदीप पवार, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
ऍड. पवार यांनी पोलीस निरीक्षक म्हणून राज्यभर विविध ठिकाणी सेवा बजावली. पोलीस दलातील निवृत्तीनंतर त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. वकिली केली. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यातही योगदान दिले. 1994 मध्ये कोल्हापूरमध्ये मराठा सेवा संघाची स्थापना करणाऱया संस्थापकांपैकी ते एक होते. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सेवा संघाचे संघटन करण्याबरोबरच विचार रूजविण्याचे कार्य केले.
दीर्घकाळ जिल्हाध्यक्षपद भूषविणारे पवार परखड, स्पष्टवक्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. सेवा संघाच्या बैठका, अधिवेशनांना त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या निधनावर सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, त्यांच्या पत्नी माजी आमदार रेखा खेडेकर, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, मराठा समाज सेवा संघटनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, लोकराजा छत्रपती शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै. बाबा महाडिक, माईंड पॉवरचे विठ्ठल कोतेकर आदींनी शोक व्यक्त केला आहे.









