प्रतिनिधी/ सातारा
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आडवा. त्यांना घरातून बाहेर पडून देऊ नका. आरक्षण का मिळाले नाही, याचा जाब विचारा. त्यातून तुमचे समाधान झाले नाही तर माझ्यासह सर्वांना घराबाहेर फिरू देऊ नका. समाजामुळे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत. माझ्यामुळे समाज आहे, अशा मस्तीत आमदार व खासदारांनी राहू नये. मराठा समाजाने ठरविले तर तुमची मस्ती एका दिवसांत उतरवतील, असा इशारा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
साताऱयात गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या कार्यालयांवरील दगडफेक आंदोलन, गृहराज्यमंत्र्यांच्या घरासमोरच होळी पेटवून झालेली घोषणाबाजी आणि त्यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेल्या कृतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी देखील साताऱयात मराठा आरक्षणाचे धुमशान धगधगत होते. मराठा आरक्षण प्रश्नी खासदार उदयनराजे यांनी रोखठोक भूमिका व्यक्त केली. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यातील सर्वांचे लक्ष उदयनराजेंच्या लागले होते.
गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या खासदार उदयनराजेंनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे. बाकीच्या समाजाला आरक्षण दिले गेले, त्यावेळी इतका अभ्यासही केला गेला नव्हता. गायकवाड आयोगाच्या अहवालावर अभ्यास करून आरक्षण देण्यात आले होते. मराठा समाजात आमदार, खासदार मंत्री आहेत, किती आहेत. पाच टक्के असतील 95 टक्के लोक गरीबच आहेत. सिलिंगमध्ये मराठय़ाच्या जमिनी गेल्या. शिक्षणात ही आरक्षण ठेवणार नसाल तर शासन करतंय काय. मी कोणत्या पक्षाच्यावतीने अथवा समाजाच्यावतीने नव्हे तर नागरीक म्हणून म्हणणे मांडत आहे.
हा न्यायालयाचा निकाल असला तरी आता लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहेत. सर्वच जातीच्या आर्थिकदृष्टय़ा दूर्बलांना आरक्षण दिले गेले पाहिजे याची आमदार, खासदारांची जबाबदारी नाही का ? ते का भाष्य करत नाहीत ? मी मागेच याविषयी चर्चा झाली त्यावेळी श्वेत पत्रिका काढा असे सांगितले होते. मात्र, वकिल थांबत नाहीत, हजर राहत नाहीतर दुसऱयावर बोट दाखवायचे कशासाठी? असा सवाल करुन खासदार उदयनराजे यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आडवा. त्यांना घराच्या बाहेर येऊ देऊ नका. त्यांना बोलते करा. त्यातून तुमचे समाधान झालेल नाही, तर मी असलो तरी मलाही बाहेर फिरून देऊ नका, असे ठणकावून सांगितले.