संजय गायकवाड / सांगली
लग्न म्हटले की खर्च आलाच. हल्ली तर समाजातील प्रतिष्ठा जपण्यासाठी लाखोंचा खर्च करून धुमधडाक्यात लग्ने होऊ लागली आहेत. मुलाबाळांच्या लग्नासाठी अक्षरशः कर्जे काढून लग्ने केली जात आहेत. कायद्याच्या बडग्यामुळे हुंडा आणि मानपान हे विषय मागे पडत चालले असले तरी लग्नसमारंभातील झगमगाट मात्र कमी झालेला नाही. सर्वच समाजामध्ये कमी अधिक प्रमाणात हेच चित्र आहे. मराठा समाजातील नव्या पिढीने मात्र आता बदलायचे ठरविले आहे. किमान
लग्नसमारंभातील वाढता खर्च टाळण्याच्या दृष्टीने मराठा समाजातील तरूण तरूणींनी सत्यशोधक व शिवशाही विवाहाचा अंगीकार करण्यास सुरूवात केली आहे. सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत या दोन पध्दतीने 50 विवाह झाल्याची माहिती पुढे येत असून ही सुरूवात असली तरी लग्नसमारंभातील वाढते खर्च टाळण्यासाठी मराठा समाजच नव्हे तर अन्य समाजातील नवी पिढी पुढे येईल, अशी आशा या उपक्रमात काम करणारी मंडळी व्यक्त करताना दिसत आहेत.
पूर्वी घराच्या दारातच मंडप घालून लग्ने होत असत. अगदी देवळातही लग्ने होत असत. आजही सागरेश्वर, नृसिंहवाडी आदी ठिकाणी काही प्रमाणात लग्ने होतात. खेड्यापाड्यात अगदी पत्रावळ्यावर वऱ्हाडी मंडळींना शिराभाताचे जेवण घालून अनेकांची लग्ने झाली. पण हल्ली लोकांना पत्रावळीवर आणि शिराभाताचे जेवण खाणे कमीपणाचे वाटते.पूर्वी सागरेश्वर येथे अक्षता पडल्यावर वऱ्हाडी मंडळीना लाडू चिवडा वाटला जायचा. त्यात लोकांना आनंद वाटायचा. पण हल्ली श्रीखंड पुरीशिवाय लग्ने होत नाहीत. जागेची अडचण असल्याने हल्ली बहुतांश लग्ने ही कार्यालयात होतात. कार्यालयाचे भाडे, व इतर मिळून होणारा खर्च काही लाखाच्या तर अतिश्रीमंताच्याकडे काही कोटीच्या घरात हा खर्च होतो.
नेमका हाच मुद्दा पकडून सांगलीतील मराठा सोशल ग्रुपचे ए. डी. पाटील, इस्लामपूरचे सत्यशोधक कार्यकर्ते डॉ. प्रा. विजय गायकवाड, सुरेंद्र पाटील, मिरजेचे अमृतराव सूर्यवंशी, कोल्हापूरचे नवनाथ शिंदे, जोखे सर, करमाळ्याचे अमोल पाटील, अमर पाटील, सुरेश पाटील, सचिन पाटील आदी मंडळींनी मराठा समाजातील विवाहावर होणारा वाढता खर्च आणि अनिष्ट प्रथा बंद करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरूवात केली. त्यातूनच सत्यशोधक व शिवशाही विवाहाची संकल्पना पुढे आली.
सत्यशोधक विवाहाची प्रथा तशी नवीन नाही. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 रोजी पुण्यामध्ये सत्यशोधक चळवळीची स्थापना केली. त्यानंतर ऋग्वेद कालीन विवाह विधीला समांतर पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्यशोधक विवाहविधी करण्यास सुरूवात केली. त्यात शपथविधीचा समावेश करण्यात आला. सत्यशोधक विवाह विधीचे स्वरूप, मंगलाअष्टक व पूजाविधीची पुस्तिका सन 1887 मध्ये प्रकाशित झाली. पुढे यात काळानुरूप बदल होत गेले.
सत्यशोधक विवाहाचे स्वरूप
सत्यशोधक विवाह पध्दतीमध्ये विवाहस्थळी वधूवरांचे आगमन झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आदींच्या प्रतिमेंचे पूजन, निर्मिक म्हणजे सृष्टीची निर्मिती करणाऱ्या पृथ्वीच्या गोलाची पूजा व वृक्षारोपण तसेच पालकांचा सन्मान व वधूवरांकडून शपथविधी झाल्यावर सत्यशोधक पध्दतीने मंगलाष्टका म्हटल्यावर अक्षता म्हणून तांदळाची नासाडी टाळण्यासाठी पुष्पवृष्टी केली जाते.
मराठा समाजातील नव्या पिढीकडून मान्यता
दरम्यान, सत्यशोधक व शिवशाही पध्दतीने विवाह करणे मराठा समाजातील जुन्या लोकांना अजूनही मान्य नाही. नव्या पिढीकडून मात्र सत्यशोधक विवाह पध्दतीला मान्यता दिली जात आहे. मागील काही वर्षात सांगली जिल्ह्यात सत्यशोधक व शिवशाही पध्दतीने जवळपास 40 विवाह झाले आहेत. तर याच पध्दतीने विधवा विधुरांची 13 लग्ने झाली असल्याची माहिती, ए. डी. पाटील व विजय गायकवाड यांनी दिली.








