प्रतिनिधी / सातारा
चार वर्षांपूर्वी राजधानी सातारा येथे न भूतो न भविष्यती असा 3 ऑक्टोबरला मराठा समाजाला मोर्चा काढण्यात आला होता. त्याच मोर्चाची आठवण म्हणून आणि या महाविकास आघाडी सरकारच्या निषेध म्हणून घोषणा देत पोवई नाक्यावर अगोदर निषेध नोंदवला. या सरकारच करायचं काय खाली मुंढी वर पाय, कोण म्हणतं देत नाय घेतल्याशिवाय रहात नाय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन शिवतीर्थ दणाणून सोडले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक हरिष पाटणे, अमोल मोहिते, विवेकानंद बाबर, शरद जाधव, बापू क्षीरसागर यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मराठा समनव्यक हरिष पाटणे म्हणाले, आज तीन ऑक्टोबर. सगळ्या महाराष्ट्राने मराठा समाजाचा जन सैलाब साताऱ्यात पाहिला. तो चार वर्षापूर्वी 3 ऑक्टोबर याच दिवशी. याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात 35 लाखांचा मराठा क्रांती मोर्चा निघाला आणि महाराष्ट्रासह जगभरातल्या सगळ्यांनीच मराठा समाजाच्या विराट मोर्चाचे दर्शन घेतले. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे मराठा समाज आपल्या मागण्यासाठी पेटून उठला आहे. कोपर्डीच्या भगिनीवर जो अत्याचार झाला. ती क्रांतीची मशाल घेऊन हा वणवा महाराष्ट्राभर पेटला. आणि मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सगळे समाज बांधव एका झेंड्याखाली एकत्र आले. दुर्दैवाने आज ही मराठा समाजाच्या त्या मागण्या प्रलंबित आहेत.
घरदार सोडून पोराबाळासह रस्त्यावर उतरला परंतु त्या समाजाला आजही न्याय मिळाला नाही, आजही मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. कधी संसदेच्या चौकटीत तर कधी न्यायालयाच्या दालनात मराठा समाजाचा प्रश्न अडकवला जातोय. संघटनांची शकलं पडत आहेत. वेगवेगळ्या बैठका लावल्या जात आहेत. वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहेत. शह, प्रतिशह होत आहेत. सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. या राजधानीत मराठा क्रांती मोर्चा खाली सगळे बांधव एका छत्राखाली येतो राज्यातील मराठा समाजाला विनंती करतो की शकलं पाडू नका, एक मराठा लाख मराठा या एका ध्येयाखाली, एका छत्राखाली एकत्र या.
आपले जे प्रश्न न्याय संस्थेच्या पातळीवर आहेत ते सोडवण्यासाठी जी मांडणी करावी लागेल ती प्रभावीपणे करावी. त्यासाठी सकल मराठा समाज पाठीशी उभा राहील. अभ्यासकांनी, न्याय संस्थेत काम करणाऱ्या वकील मंडळींनी, आणि संसदेत असलेल्या लोक प्रतिनिधीनी आणि मराठा समाजाच्या सगळ्या आमदार, खासदारांनी पक्षीय मतभेद विसरून एकत्र यावे ही सातारा जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाची प्रामाणिक इच्छा आहे.या भूमिकेला छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मनापासून पाठिंबा आहे. हा पाठींबा घेऊनच सातारा जिल्ह्यातील मराठा समाज सातत्याने आक्रमक भूमिका घेत असतो. तुम्ही सुद्धा हीच भूमिका घेऊन संसदेच्या पातळीवर , न्याय संस्थेत प्रमाणिक भूमिका मांडा, समाजासाठी एक दिलाने एकत्र या ही मागणी आहे, असे सांगितले.
Previous Articleन्यायासाठी नव्हे राजकारणासाठी राहुल गांधींना जायचयं हाथरसला
Next Article … प्रकाशकांची भूमिका मोलाची : महापौर









