नांदेड आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई :राज्यभरात संतापाची लाट :खासदार संभाजीराजेही भडकले
प्रतिनिधी / कोल्हापूर
नांदेड येथील शुक्रवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या मूक आंदोलनानंतर पोलिसांनी कोरोनाचा कारण पुढे करत पंचवीस मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकारानंतर राज्यातील मराठा समाजात संतापाची लाट उसळली असून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गुन्हा दाखल करायचे आहेत तर मराठा कार्यकर्त्यांवर दाखल करू नका, माझ्यावर दाखल करा, अशा संतप्त शब्दात संभाजीराजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठा क्रांती मोर्चाचे मूक आंदोलन शुक्रवार 20 ऑगस्टला नांदेडमध्ये झाले. या आंदोलनात खासदार संभाजीराजे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधताना मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण द्या, अशी मागणी केली. त्याचबरोबर केंद सरकारने आरक्षणावरील 50 टक्क्यांची असणारी मर्यादा काढण्यासाठी राज्य घटनेत दुरूस्ती करावी, राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करावे, त्यासाठी मागासवर्ग आयोग नियुक्त करून प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी केली. यावेळी संभाजीराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकार सध्या जबाबदारी झटकत असून एकमेकांकडे बोट दाखवित असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. त्याचबरोबर या आंदोलनाला नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी साधी भेट देवून मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दलही थेट नाराजी व्यक्त केली होती. संभाजीराजे यांच्या विधानानंतर अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन भाजप पुरस्कृत होते, अशी टीका केली होती.
पंचवीस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
दरम्यान, नांदेडमधील मूक आंदोलनातील पंचवीस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कोरोनाच्या नियमांचे कारण दाखवून गुन्हे नोंद केले. त्यानंतर राज्यभरातील मराठा समाजात संतापाची लाट उसळली असून पोलिसांच्या कारवाईचा निषेधही करण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनीही लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱया मराठा समाजावर पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायी असल्याचे म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांचे आरोप बिनबुडाचे :मराठा क्रांती मोर्चा
मराठा क्रांती मोर्चाचे नांदेड येथील आंदोलन भाजप पुरस्कृत होते, असा आरोप नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. हा आरोप नांदेड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने फेटाळून लावला आहे. समन्वयक माधवराव पाटील-देवसरकर यांनी चव्हाण यांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की :संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव आपल्या न्याय्य मागणीसाठी एकत्रित आले आहेत. आंदोलान करत आहेत. चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, त्याचे आम्ही स्वागत करू. मात्र समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत तर समाज त्यांना योग्य धडाही शिकवेल.
माझ्यावर गुन्हे नोंद करा :संभाजीराजे भडकले
मराठा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याच्या वृत्तानंतर खासदार संभाजीराजे यांनी ट्व्टि करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्व्टिमध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे, गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्यावर दाखल करा, सामान्य, गरीब मराठा बांधवांच्यावर का?, समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का? असा संतप्त सवालही संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.