प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा कॉलनीला गेल्या काही वर्षांपासून पुराचा फटका बसू लागला आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने यावषीही पुराचा फटका परिसरातील जनतेला बसत आहे. बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर यांनी महापालिकेकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे या कॉलनीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे. तेव्हा तातडीने महापालिकेने या परिसरात लक्ष देऊन पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.