मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणं लावण्याचा कुटील डाव लपवण्याचा पवारांवर आरोप
दोन्ही समाजात भांडणे लावण्याचा डाव
प्रतिनिधी / सांगली
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनेक वर्षे सत्तेत होते, त्यावेळी मराठा, ओबीसी समाजांना आरक्षण देण्याचा विचार त्यांनी केला नाही. विशेष म्हणजे त्यांचाच या दोन्ही समाजांना आरक्षण देण्यास विरोध आहे, असा आरोप माजी कृषी राज्यमंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. आताही या दोन्ही समाजाला आरक्षण देण्याची भावना पवारांची नाही. त्यामुळेच वारंवार केंद्र सरकारकडे बोट दाखवून दोन्ही समाजामध्ये भांडणे लावण्याचा कुटील डाव पवार खेळत असल्याचेही खोत यांनी सांगितले.
ओबीसी समाज राजकीय आरक्षणापासून वंचित राहणार असल्याचा जावईशोध शरद पवार यांनी लावला असल्याचे सांगत खोत म्हणाले, राज्यातील ओबीसी समाजाला भडकवण्याचे काम पवार यांच्याकडून सुरु आहे. पवार वर्षानुवर्षे सत्तेत होते. केंद्रात सलग पंधरा वर्षे तुम्ही मंत्री म्हणून काम केले आहे. त्यावेळी ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कधी सोडवण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. दोन्ही समाजाला न्याय द्यायचा नाही, मात्र दोन्ही समाजातील वाद पेटत राहिला पाहिजे, तरच आपले राजकारण चालणार आहे, अशी दुटप्पी भूमिका आहे.
केंद्र सरकारने 127 वी घटना दुरुस्ती केली आहे, त्यामुळे वेगवेगळया समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना मिळाला आहे. परंतु महाविकास आघाडी केंद्राकडे बोट करुन स्वतःचे अपयश दुसऱयाच्या माथी मारायला निघाले असल्याचे दिसते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून रेंगाळत आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचे होते तर राज्य मागासवर्ग समितीमध्ये किती लोक घेतले. जे लोक घेतले, त्यांची भूमिका आरक्षण देण्याच्या विरोधात होती. तेच लोक समितीत घेण्यात आले आहेत असा आरोपही खोत यांनी केला.
दोन्ही समाजात भांडणे लावण्याचा उद्योग
आरक्षणाच्या बाबतीत वारंवार केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. स्वतःचे अपयश लपविण्यासाठीच अशी कुटनिती खेळली जात आहे. वास्तविक मराठा आणि ओबीसी समाजाचा प्रश्न प्रलंबित ठेवत दोन्ही समाजाच्या भांडणे लावण्याचा उद्योग पवारांनी सुरु केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा सरदारांचा प्रश्न आहे. उर्वरित लोक त्यांचे गुलाम आहेत, असे ठरविले जाते. गुलाम पुढे गेले तर सरदार अडचणीत येतील, असा कयास पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांकडून लावला जात असल्याची आरोपही खोत यांनी केला.