जम्मू येथील किश्तवाड भागातील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
जम्मू येथील किश्तवाड भागात चित्तोमाताय यात्रेसाठी निघालेल्या दोन महिला आरोग्याच्या समस्यांमुळे अडकून पडल्या होत्या. त्या महिलांना दुर्गम भागातून वाट काढत 17 राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाईट इन्फंट्री) च्या जवानांनी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार केल्याने त्या महिलांचा जीव वाचला. या साहसाबद्दल जवानांचे कौतुक करण्यात येत आहे.
5 जुलै रोजी पहाटे 5 वा. गस्त घालणाऱया सैनिकांना अंधारातून मदतीच्या हाका ऐकू आल्या. सैनिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेथे नीलमकुमारी (वय 62) व वैष्णवदेवी (वय 60) रा. जम्मू या महिला दिसल्या. नीलमकुमारी यांना कमी रक्तदाबाचा आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. वैष्णवदेवी यांचा पडल्यामुळे पाय मोडला होता. जवानांनी प्रथमोपचार केला. दुर्गम भागातून वाट काढत नदी ओलांडून अथोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या महिलांना हलविले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे दोन्ही महिलांचे जीव वाचले. या महिलांच्या कुटुंबीयांनी आणि इतर यात्रेकरूंनी भारतीय सैनिकांच्या धाडसाचे कौतुक केले.









