- आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मराठा विद्यार्थी परिषदेची मागणी
ऑनलाईन टीम / पुणे :
दिनांक 11 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर व 22 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलाव्या व उमेदवारांची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी आमदार विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीमध्ये मराठा विद्यार्थी परिषदेने पत्रकार परिषदेत केली आहे. परिषदेला अनुप देशमुख, परम बिराजदार, अर्चना पाटील, विक्रम गायकवाड, पूजा झोळे उपस्थित होते.
1. दिनांक 5 एप्रिल व 20 सप्टेंबर रोजी कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, सद्यपरिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खेड्यापाड्यापर्यंत हे लोण पसरलेले आहे. स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य व अनेक विद्याथीर्ही कोरोना ग्रस्त असल्याने त्यांना अभ्यास करून देखील परीक्षा देणे शक्य होणार नाही.
2. कोरोना पार्श्वभूमीवर अभ्यासिका व कोचिंग कलासेस बंद असल्यामुळे योग्य ती तयारी करू शकलेले नाहीत.
3. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे, अश्या विद्यार्थ्यांना, कॉम्पुटर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन नाहीत त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करू शकलेले नाहीत.
4. यूपीएससी परीक्षेला 4 ऑक्टोबर रोजी याच कारणामुळे साधारणत: 30 ते 35 टक्के विद्यार्थी हजरच होऊ शकले नाही आणि अश्या प्रकारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) उमेदवारांचे देखील नुकसान होऊ शकते.
5. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे जिल्हा सोडून इतर ठिकाणी विभागीय स्तरावर परीक्षा केंद्रे आहेत, कोरोना व अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक चणचण सर्व घटकांना भासत आहे, विद्यार्थ्यांना प्रवासासाठी आवश्यक खर्च सुद्धा करायची आर्थिक स्थिती नाही. विद्यार्थी दूरवरचा असेल तर येणार कसा?
6. मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेऊ नये असं काही लोकांचं म्हणणं आहे तर काही लोकांचं म्हणणं आहे इडब्लूएस आरक्षणाचा लाभ मराठा समाजाने घ्यावा या बाबतीत दोन्ही कडील लोकांनी व सरकारने विद्यार्थ्यांचे हित कशामध्ये याची स्पष्टता द्यावी.
7. दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजीची स्थगिती पूर्वी निवड प्रक्रिया सुरु किंवा पूर्ण झाल्या परंतु त्यांना रुजू करून घेतले नाही अश्या सर्व मराठा उमेदवारांना ताबडतोब रुजू करून घ्यावे.
8. दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजीच्या स्थगिती पूर्वी ज्यांची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे अश्या सर्व मराठा उमेदवारांचे प्रवेश सुरक्षित करावेत.
9. सारथी संस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या ज्या शिष्यवृर्त्या रखडलेल्या आहेत व ज्यांचे निकाल लागलेले आहेत, ते लवकरात लवकर पूर्ण करून सारथी संस्थेला निधी उपलब्ध करून अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत व पूर्ण क्षमतेने ताकद द्यावी सारथी संस्थेची अभ्यासिका सुरु करावी.
10. मराठा समाजातील एमपीएससी व यूपीएससी परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे 5000 व दिल्ली येथे 1000 विद्यार्थ्यांचे वसतिगृह तातडीने बांधून द्यावे.
मराठा समाजातील जे नेते मंडळी हि परीक्षा होऊ द्यावी असे म्हणतात त्यांना आमचं भविष्य खराब करायचं आहे का, आमच्या भविष्यापेक्षा त्यांना कोणाची जास्त काळजी आहे क्लासेसवाल्यांची, इतर समाजाची कि सरकारची काळजी आहे हे स्पष्ट करावे. आमची त्यांना विनंती आहे कि त्यांनी अशी चुकीची भूमिका घेऊ नये.
मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आम्हा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल व जगभरामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यावर काय होते हे आम्ही सरकारला सांगण्याची गरज नाही त्यामुळे मायबाप सरकारने या परीक्षा पुढे ढकलाव्या. शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा घेऊन मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्याची राखरांगोळी करू नये.








