जलसंपदा मंत्री जयंत पाटील ; अन्य जातींच्या आरक्षणाला धक्का नाही
सांगली / प्रतिनिधी
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आले आहे. ते टिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान अन्य कोणत्याही जातींच्या आरक्षणाला यामुळे धक्का लागणार नाही. त्यांच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव आगर विचार नाही असे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी येथे बोलताना स्पष्ट केले.
मंत्री पाटील यांच्या हस्ते सांगलीत अप्पर तहसीलदार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पत्रकार बैठकीत बोलताना पाटील म्हणाले, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा कोणताही विचार नाही. तसा प्रस्तावही नाही. त्यामुळे कोणी जनतेमध्ये गैरसमज निर्माण करू नयेत. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आले आहे. ते टिकविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. दरम्यान सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात अनेक प्रश्न आहेत. महापौरांनी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यानुसार लवकरच आढावा बैठक घेऊ. सर्व समस्यांचे निराकरण करू.
दरम्यान कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास त्याचा परिणाम होईल अशी सांगली, कोल्हापूर करांची धारणा आहे. मात्र यामुळे काही परिणाम होणार नाही हे अभ्यासाअंती सिद्ध झाल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.