वार्ताहर / गोकुळ शिरगाव
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा दूध पुरवठा रोखून सरकारची कोंडी करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ( गोकुळ दूध ) गोकुळ शिरगाव ता. करवीर जिल्हा कोल्हापूर येथे सकल मराठा आंदोलकांनी तर्फे ठिय्या आंदोलन करीत कोल्हापूरहून मुंबईला दूध पुरवठा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
तसेच आंदोलकांच्यावतीने पोलीस भरती व इतर सर्व भरती आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने ठोस भूमिका मांडण्यासाठी सोमवार पर्यंतचा अल्टीमेटम सरकारला यावेळी देण्यात आला. सरकारने कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावे अन्यथा सोमवारपासून वर्षा बंगला, मातोश्री बंगला यासह सर्वच मुंबईकरांना काळा चहा पिण्याची वेळ येईल कोल्हापूर व इतर सर्व ठिकाणांवरून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखून मुंबईची रसद तोडून गनिमीकाव्याने आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला.
पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करीत आंदोलकांना ताब्यात घेतले व पोलीस बंदोबस्तात गोकुळ दूध संघाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले असून दूध पुरवठा सुरू झाला आहे. यावेळी गोकुळ दूध संघ, गोकुळ शिरगाव, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अशा अनेक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने जमावबंदी आदेशाचे पालन करीत शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन पोलीसदला मार्फत आंदोलकांना करण्यात येत आहे.
Previous Articleतासगावात एकाच दिवशी 48 रूग्ण सापडले
Next Article भारतातील औषधी वनस्पती परंपरा









