पाटगाव / वार्ताहर
मराठा आरक्षणासाठी राजा म्हणून नाही तर सेवक म्हणून लढत राहणार अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली ते पाटगाव (ता.भुदरगड) येथे भुदरगड तालुका सकल मराठा समाजच्यावतीने आयोजित संघर्ष यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार प्रकाशराव अबीटकर, माजी आमदार दिनकरराव जाधव,माजी सभापती धनाजीराव देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. संभाजीराजे यांनी आपण छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती ताराराणी, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा पाईक असल्याचे सांगितले.
मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई साठी सर्व समाजाने एकसंघपणे लढा दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी जाताना पाटगाव येथून संत मौनी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन गेले होते व मोहीम फत्ते झाली होती. त्याच पद्धतीने आजच्या मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी आपण ही मौनी मठातून महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई आपण निश्चित जिंकू असे सांगितले. मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत योग्य पणाने लावून धरू असे सांगत सर्वच राजकीय पक्षातील मराठी नेत्यांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरावा असे आव्हान केले.सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले पाहिजे या करिता विशेष प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी पाटगाव ते आदमापूर अशी संघर्ष रॅली चे आयोजन करण्यात आले होते खा.संभाजीराजे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅली रद्द करण्याचे आव्हान तरुण कार्यकर्त्यांना केले. युवकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रॅली रद्द केली. गारगोटी,कडगाव,पाटगाव आदी प्रमुख गावे भगवेमय झाली होती.एक मराठा-लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे,आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी ,सचिन भांदीगरे, किरण अबीटकर, ऋतुजा गुरव,प्राची सुतार यांनी मनोगतं व्यक्त केली. स्वागत मुख्याध्यापक सचिन डेळेकर यांनी केले या वेळी मठाधिपती संजयदादा बेनाडीकर,सत्यजित जाधव,राहुल देसाई,संजय बेनाडीकर,बाबा नांदेकर,संदेश भोपळे,नंदकुमार शिंदे,विश्वनाथ कुंभार,मॅचिंद्र मुगडे,शशिकांत पाटील,प्रविनसिह सावंत,अर्जुन अबीटकर,विश्वजीत जाधव,संदीप वरंडेकर,नंदकुमार ठाकूर,अविनाश शिंदे,महेश पीळनकर आदी प्रमुख उपस्थित होते.
मुस्लिम समाजाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा
बहुसंख्याक मुस्लिम असणाऱ्या अनफ खुर्द येथील मुस्लिम समाज बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.रॅली साठी उपस्थितीत दुचाकीस्वाराना पाणी बाटली वाटप केले.उत्स्फूर्त पणे खासदार संभाजीराजे यांचा सत्कार केला.









