कोल्हापूर \ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली आहे. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना खासदार धैर्यशील माने यावेळी हाताला सलाईन लावून मराठा मोर्चात सहभागी झाले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे, अशी भूमिका मांडली.
यावेळी धैर्यशील माने म्हणाले की, महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व प्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चितपणे यशस्वी होईल. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे. हे नक्कीच यशस्वी होईल.
आरक्षण कोणामुळे थांबलं, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही हा समाजाला प्रश्न आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असं शिवसेना खासदार धैर्यशील माने यावेळी सांगितले.
न्यायालयीन लढाईत बाजू व्यवस्थित मांडण्यासाठी समिती गठीत झाली आहे. महाराष्ट्राने नवीन मागास आयोगही नेमला. हा राज्याचा की केंद्राचा प्रश्न समाजाला आहे. 48 खासदारांनी अधिवेशनाची मागणी करावी, लोकसभेच आधिवेशन मराठा समाजासाठी झालं पाहिजे, अशी इच्छा देखील त्यांनी यावेळी बोलून दिली.
कोल्हापुरात भर पावसात काळी कपडे तसेच हातात भगवा व तोंडाला मास्क घालून आंदोलक व नेते मंडळी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अशा स्थितीत खासदार धैर्यशील माने आजारी असताना देखील हातात सलाईनची सुई घेऊन सहभागी झाले आहेत. त्यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्यासोबतच काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.