मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. आमच्या भावना राज्यपालांना कळवण्यासाठी आम्ही भेट घेतली. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्याबाबतच राज्यपालांना भेटलो. निकालामध्ये म्हटलंय आरक्षणाचा अधिकार राज्याचा नाही तर केंद्राचा आहे. त्यामुळे आम्ही केंद्राला आणि राष्ट्रपतींना आमच्या भावना कळवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. आमच्या भावना केंद्रापर्यंत पोहोचवू असे त्यांनी यावेळी सांगितल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच यासाठी आम्ही लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळाने एकमताने निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जसं आज राज्यपालांना पत्र दिलं, तसं पंतप्रधानांची भेट घेऊन पत्र देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आज राष्ट्रपतींना पत्र दिलं. आता पंतप्रधानांनी रितसर वेळ मागून भेट घेऊ आणि त्यांनाही पत्र देऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने पहिली पायरी म्हणून राज्यपालांची भेट घेतली. आम्ही बोललो होतो, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करु, ते आम्ही राज्यपालांच्या माध्यमातून केली आहे.मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला. त्यांना माहिती आहे, ही लढाई सरकारविरोधात नाही, सरकारही सोबत आहे. या समाजाच्या मागणीविरोधात कोणताही पक्ष नाही. जो काही समजूतदारपणा दाखवला आहे, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. सरकार मराठा समाजाच्या सोबत आहे, असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.