प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचार लातूर येथे होणार
प्रतिनिधी / चाकूर
राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगीती दिल्यामुळे चाकूर तालुक्यातील बोरगाव बु.येथील एका उच्च शिक्षीत तरुणाने चाकूर तहसीलच्या प्रांगणात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
तालुक्यातील बोरगाव बु.येथील किशोर कदम वय वर्षे २५ या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाला बुधवार दि.९ सप्टेंबर रोजी न्यायालयाने स्थगिती दिल्याने तहसिल येथे आत्महत्या करणार असल्याचा इशारा एक चिठ्ठी लिहुन व स्वत:चा व्हिडिओ करून सोशल मिडीयावरुन व्हायरल केला होता. कदम याचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे . सध्या तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.
गुरुवार दि.१० सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याने चाकूर तहसिलच्या प्रांगणात औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता त्याला तहसील येथील कर्मचाऱ्यांनी चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिपक लांडगे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी तपासणी व उपचार करुन प्रकृती चिंताजनक वाटत असल्याने पुढील उपचारासाठी लातूरला पाठविले आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे , पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण उपस्थित होते.
काल सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती दिली असल्याने व्यथीत होऊन आत्महत्या करीत आहे व माझी आरक्षणाची लढाई आणि नोकरी मिळण्याची मेहनत वाया गेली आहे. मी आठ वेळा फॉर्म भरले आहेत तरीही मला नौकरी लागली नाही .माझ्या समाजाचे व माझे जीवन अंधारमय झाले आहे .त्यामुळे मी तहसिल समोर आत्महत्या करण्याचा कठोर निर्णय घेत आहे. अशी किशोर कदम यांनी चिट्टी लिहली व व्हिडिओ केला होता. आणि अखेर खरोखरच तहसिल समोरच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला









