भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांचा इशारा ः ठाकरे सरकारने ‘सारथी’ची वाट लावली
प्रतिनिधी/कोल्हापूर
मराठा आरक्षणावर अध्यादेश हे उत्तर असू शकत नाही. कारण, कायदा उच्च न्यायालयात टिकला, हे आपले भांडवल आहे. तुमच्या अध्यादेशामुळे तो हक्क घालवून बसाल. अध्यादेश काढल्यास दुसऱया दिवशी स्थगिती येईल, असा इशारा मराठा आरक्षण उप समितीचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला. ‘सारथी’ संस्थेची ठाकरे सरकारने वाट लावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, महाविकास नव्हे, महाभकास आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही. राज्य सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत इच्छाशक्ती नाही. मुळात तिन्ही पक्षात सुसूत्रता नसल्याने आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत कधी चर्चा केली नाही. काँग्रेसला देखील मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यात रस नाही. मुख्यमंत्री ठाकरे घरी बसून राज्य चालवणारे आहेत. सारथी संस्थेची देखील या सरकारने वाट लावली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाला ‘उल्लू’ बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला.
ठाकरे आणि राऊत यांना केवळ भाटगिरी हवी आहे
ठाकरे आणि राऊत यांना केवळ भाटगिरी हवी आहे, अशी खरमरीत टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात 45 दिवसांत एफआयआर का दाखल नाही केला, असा सवाल करत आम्ही चुका दाखवतच राहणार. चुका दाखवणे म्हणजे, महाराष्ट्राची बदनामी नव्हे. महाराष्ट्राची आणि पोलिसांची बदनामी तुम्हीच (ठाकरे सरकारने) केली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.