पिडीओ, तलाठय़ाला मारहाण, आरोग्य पथकावर दगडफेक, स्वॅब घेण्यास केला विरोध
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ात कोरोनायोद्धय़ांवर हल्ले सुरुच आहेत. शुक्रवारी दुपारी स्वॅब जमविण्यासाठी मरणहोळ (ता. बेळगाव) येथे गेलेल्या आरोग्य पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांना पिटाळून पिडीओ व तलाठय़ाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
न्यू वंटमुरी ग्रामपंचायतीचे पिडीओ प्रशांत मुनवळ्ळी (वय 37) व तलाठी प्रशांत नेसर्गी (वय 32) हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले आहेत. तर आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांनाही पिटाळण्यात आले आहे. तर स्वॅब जमविण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय कर्मचाऱयांवरही दगडफेक करण्यात आली आहे.
मुंबईहून गावी परतलेल्या 22 हून अधिक जणांना प्राथमिक शाळेत क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. क्वारंटाईनमधील नागरिकांनी स्वॅब तपासणीला विरोध केला होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी तहसीलदार आर. के. कुलकर्णी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ, पिडीओ, तलाठी आदींनी मरणहोळला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.
तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वॅबतपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सहकार्य करा, असे अधिकाऱयांनी त्यांना सांगितले होते. दुपारी 3 वाजता स्वॅब जमविण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक मरणहोळला पोहोचले. यावेळी क्वारंटाईनमधील नागरिकांनी स्वॅब घेण्यास विरोध केला. कर्मचाऱयांना शिवीगाळ सुरू केली.
परिचारिका, टेक्नीशियन, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रकार सुरू झाला. त्यावेळी पिडीओ व तलाठी यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. क्वारंटाईनमधील नागरिकांनी गावातील काही जणांना बोलावून घेतले. पिडीओ, तलाठय़ाला मारहाण करतानाच इतरांवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे आरोग्य पथकातील कर्मचारी घाबरुन गेले. तातडीने काकती पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
या घटनेनंतर काकतीचे पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी व त्यांचे सहकारी मरणहोळला पोहोचले. पोलीस दाखल होण्याआधी कोरोनायोद्धय़ांवर हल्ला करण्याऱयांनी तेथून पलायन केले होते. सायंकाळी तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांनीही मरणहोळला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी व जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र आदी अधिकाऱयांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
रात्री उशीरापर्यंत या संबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्लेखोरांवर खटला दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांनी केंली आहे. क्वारंटाईनमधील 7 ते 8 जणांनी गावातील काही जणांच्या मदतीने हे कृत्य केले असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
मोबाईल फोडले
मारहाण व दगडफेकीचे प्रकार सुरू असताना तलाठी प्रशांत नेसर्गी यांनी आपल्या मोबाईलमधून व्हिडीओ चित्रीकरण सुरू केले. चित्रीकरण का करतोस, अशी विचारणा करीत तलाठय़ाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेवून तो फोडण्यात आला आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीस, महसूल व आरोग्य विभागाचे वरि÷ अधिकारी मरणहोळमध्ये तळ ठोकून होते.









