तीन वर्षे झाली तरी रस्ताकाम अर्धवटच : प्रवाशांतून तीव्र संताप
प्रतिनिधी /बेळगाव
संत मीरा हायस्कूल-मरगाई मंदिर समोरचा हा रस्ता गेल्या तीन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. स्मार्टसिटी अंतर्गत या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र कासवापेक्षाही संथगतीने या रस्त्याचे काम सुरू असल्याने अनगोळ, वडगाव, येळ्ळूर, धामणे यासह परिसरातील वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्याबरोबरच आनंदनगरला जोडणारा रस्ता देखील पूर्ण खराब झाला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आनंदनगरपासून जाणारा हा रस्ता भाग्यनगर, अनगोळ, उद्यमबाग यासह खानापूर रस्त्याला जोडला गेला आहे. हा एक सर्वात महत्त्वाचा रस्ता म्हणून पाहिले जाते. या रस्त्यावरून येळ्ळूर केएलईला रुग्ण जात असतात. मात्र अनेक ठिकाणी खड्डे, अनेक ठिकाणी चरी मारल्या गेल्या आहेत. गटारीचे काम अर्धवट स्थितीत आहे. डेनेजचे कामही अर्धवट आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल तीन वर्षे हा रस्ता होत नाही. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून नागरिकांनी देखील सहकार्य केले आहे. या रस्त्यावर असलेल्या नाल्यावर पाईप घालण्याचे काम देखील अनेक दिवस रेंगाळले होते. यामुळे या दशकात तरी हा रस्ता होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्यावरून जीएसएस, आरपीडी, गोगटे, जैन यासह इतर महाविद्यालयांचे विद्यार्थी देखील ये-जा करतात. संत मीरा हायस्कूलही या रस्त्या शेजारीच आहे. या रस्त्याला जोडलेला आडवा रस्ता देखील पूर्णपणे खराब झाला आहे. एकूणच या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. उद्यमबागला कामासाठी जाणारे कामगार रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून ये-जा करतात. अनेक जण रात्रीच्यावेळी पडून जखमी होत आहेत. यापूर्वीही या रस्त्याचे अनेक वेळा डांबरीकरण केले. मात्र केवळ कामचलाऊ झाले.अनेक ठिकाणी गटारींचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. डेनेजचे पाणीही रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तेंव्हा संबंधीत कंत्राटदाराने काम त्वरित करण्याची मागणी होत आहे.









