डिचोली/प्रतिनिधी
मये डिचोली येथील मये वायंगिणी पंचायतीच्या खालीच असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखा सहाय्यक व्यवस्थापकाने शाखेतच सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. या आत्महत्येमागील कारण समजू शकले नसले तरी सदर आत्महत्येशी बँक व बँकेतील व्यवहाराचा कोणताही संबंध नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
काल शुक्र. दि. 9 ऑक्टो. रोजी सकाळीच सदर घटना घडली. सकाळी 9.20 वा. च्या सुमरास सदर मूळ तामिळनाडू येथील व सध्या सुधाकॉलनी डिचोली येथे राहणारा वेलमुरंगन ए. (वय 40) हा शाखा सहाय्यक व्यवस्थापक आपल्याकडील चावीने शाखेचे मुख्य शेटर व काचेचा दरवाजा उघडून शाखेत आला. त्यानंतर त्याने शाखेच्या काचेच्या दरवाज्याला आतून चावीने लॉक केले. व तो आतील सेफ कक्षात गेला. तेथील सिसीटिव्ही केमेरावर त्याने कपडा घातला आणि सदर कक्षाच्या आतील छप्पराला असलेल्या हुकला नायलॉन दोरखंडाच्या सहाय्याने गळफास घेतला.
बँक उघडण्याची वेळ झाली होती. आणि शाखेबाहेर लोक आणि बँकेतील कर्मचारीही येऊन थांबले होते. मात्र मुख्य दरवाजा आतून लॉक असल्याने कोणालाही आत प्रवेश करणे शक्मय नव्हते. इतक्मयात शाखा व्यवस्थापक शाखेजवळ पोहोचले असता त्यांनी आपल्याकडील चावीने काचेच्या दरवाज्याचे लॉक उघडले आणि आत प्रवेश केला. आत सहाय्यक व्यवस्थापक वेलमुरंगन ए. याची शोधाशोध केली असता सदर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणाची माहिती डिचोली पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस निरिक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर रामानंद व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी मये येथे दाखल झाले. पोलिसांनी घटनेच पंचनामा करून मृतदेह खाली उतरविला आणि उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठवून दिला.
सदर आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. परंतु या आत्महत्येचा बँकेतील कोणत्याही व्यवहाराशी संबंध नाही. उलट मयत वेलमुरंगन ए. याच्या वागण्यावरून तो कोणत्यातरी तणावाखाली आहे, असे वाटतच नव्हते. अशी माहिती बँकेतील कर्मचाऱयांकडून पोलिसांना देण्यात आली. तो आपल्या पत्नी आणि एका चार वर्षाच्या मुलासह सुधाकॉलनी डिचोली येथे राहत होता. तर मये शाखेत गेल्या आठ महिन्यांपूर्वीच रूजू झाला होता. अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर रामानंद अधिक तपास करीत आहे.