आयपीएल प्रँचायझीकडून अधिकृत शिक्कामोर्तब
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी आयपीएल स्पर्धेसाठी पंजाब किंग्स प्रँचायझीने नेतृत्वाची धुरा सलामीवीर मयांक अगरवालकडे सोपवत असल्याची अधिकृत घोषणा केली. भारतीय कसोटी संघातील सदस्य असलेल्या 31 वर्षीय मयांकसह युवा जलद गोलंदाज अर्शदीप सिंगला पंजाबने मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन केले होते.
‘2018 पासून मी पंजाब किंग्सचे प्रतिनिधीत्व करत आलो असून या संघातून खेळत असल्याचा सार्थ अभिमान आहे. व्यवस्थापनाने नेतृत्वाची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे’, असे मयांकने प्रँचायझीच्या वतीने जारी पत्रकातून नमूद केले.
‘नेतृत्वाची धुरा सांभाळताना माझी बांधिलकी, तळमळ त्यातून दिसून येईल. मात्र, त्याचवेळी पंजाब संघातील अव्वल खेळाडू पाहता माझी जबाबदारी बरीच हलकी, सोपी असेल’, याचा त्याने येथे उल्लेख केला. 2018 पासून पंजाब संघात असलेल्या या अव्वल फलंदाजाने संघाचा उपकर्णधार म्हणून काम पाहिले. तसेच मागील हंगामात काही कालावधीपुरते नेतृत्वही सांभाळले आहे.
‘आमच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. शिवाय, तडफदार युवा खेळाडू देखील आहेत. संधीचे सोन्यात रुपांतर करण्याची या नव्या-जुन्या खेळाडूंची महत्त्वाकांक्षा आहे. नव्या हंगामात आव्हानेही नवी असतील आणि ती जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी पंजाब प्रँचायझीचा आभारी आहे’, असे मयांक पुढे म्हणाला.
2011 मध्ये आयपीएल पदार्पण करणाऱया मयांक अगरवालने मागील 2 हंगामात 400 पेक्षा अधिक धावांची आतषबाजी केली असून याशिवाय, भारतातर्फे 19 कसोटी सामन्यात 1429 धावा त्याच्या खात्यावर आहेत. यात 4 शतकांचा देखील समावेश आहे. त्याने 5 वनडे देखील खेळले आहेत.
पंजाब किंग्सला आजवर आयपीएल स्पर्धेत फारसे यश मिळवता आलेले नसून ते आजवर केवळ एकदाच 2014 मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकले आहेत. मागील तीन हंगामात ते 8 संघात सहाव्या स्थानी फेकले गेले. यंदाच्या मेगा ऑक्शनपूर्वी या प्रँचायझीकडे सर्वाधिक निधी उपलब्ध होता. याचा लाभ घेत त्यांनी काही अव्वल खेळाडू करारबद्ध केले. आता या शिदोरीवर आयपीएलचे पहिलेवहिले जेतेपद खेचून आणण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.
कोट्स
मयांक अगरवाल मेहनती खेळाडू आहे आणि नेतृत्वासाठी लागणारे सर्व गुण त्याच्याकडे आहेत. कर्णधार या नात्याने तो संघाला पुढे घेऊन जाईल आणि यश संपादन करुन देण्यात महत्त्वाचा वाटा उचलेल, याची मला खात्री वाटते.
-पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे









