वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या इलाईट क गटातील सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर कर्नाटकाने गुजरातवर पहिल्या डावात 64 धावांची आघाडी मिळवली आहे. कर्नाटकाच्या पहिल्या डावात कर्णधार मयांक अगरवालने शानदार शतक तर मनीष पांडेने अर्धशतक झळकवले.
या सामन्यात गुजरातचा पहिला डाव 264 धावात आटोपल्यानंतर कर्नाटकाने शनिवारी आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली आणि दिवसअखेर त्यांनी 90 षटकात 5 बाद 328 धावा जमवत 64 धावांची आघाडी मिळवली. कर्णधार अगरवाल आणि रविकुमार समर्थ यांनी सलामीच्या गड्यासाठी 172 धावांची शतकी भागीदारी केली. समर्थने 7 चौकारासह 60 धावा जमवल्या. कर्णधार अगरवालने 124 चेंडूत 1 षटकार आणि 17 चौकारासह 109 धावा झळकवल्या. देवदत्त पडिकलने 1 षटकार आणि 6 चौकारासह 42 धावा जमवल्या. पडिकल आणि मनीष पांडे यांनी तिसऱ्या गड्यासाठी 65 धावांची भागीदारी केली. जोशने 2 चौकारासह 22 धावा जमवल्या. शुभांग हेगडे 11 धावावर बाद झाला. दिवसअखेर मनीष पांडे 2 षटकार आणि 4 चौकारासह 56 तर सुजय सातेरी 1 षटकार आणि 3 चौकारासह 24 धावावर खेळत आहे. गुजराततर्फे चिंतन गजाने 2 तर देसाई आणि वाघेला यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक गुजरात प. डाव सर्वबाद 264, कर्नाटक प. डाव 90 षटकात 5 बाद 328 (रविकुमार समर्थ 60, मयांक अगरवाल 109, पडिकल 42, नितीन जोश 22, मनीष पांडे खेळत आहे 56, हेगडे 11, सुजय सातेरी खेळत आहे 24, चिंतन गजा 2-43, देसाई आणि वाघेला प्रत्येकी एक बळी).








