मुंबई /ऑनलाईन टीम
पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर देशाच्या आगामी राजकारणाची वाटचाल अवलंबून आहे. यानंतर देशात विरोधी पक्षांच्या नव्या आघाड्या स्थापन होतील, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यासोबतच पश्चिम बंगालमध्ये जरी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली असली तरी ममता बॅनर्जी ही एकटी वाघीण त्यांना पुरुन उरेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते मुंबईत प्रसारमध्यमांशी बोलत होते.
मता बॅनर्जी यांनी विरोधी नेत्यांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना ते म्हणाले की, देशातील लोकशाहीवर आजपर्यंत नेहमीच आघात झाले. प्रत्येकवेळी लोक त्याविरुद्ध लढले. त्यामुळेच आज देशातील लोकशाही जिवंत आहे. ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले असून आम्ही त्यावर विचार करु. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी हे या देशातील मोठे नेते आहेत, सर्वांनाच पत्र आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी मोहीम सुरु केली आहे आणि याबाबत सर्वांना विचार करावा लागेल.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय होईल, असा दावा देखील संजय राऊत यांनी यावेळी केला. तसेच लॉकडाउन किंवा करोनाचे राजकारण करु नये. मुख्यमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री जनतेच्या हिताचे सांगत आहेत. सगळ्या विरोधी पक्षाच्या घटकपेक्षांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातात हात घालून महाराष्ट्रासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन देखील संजय राऊत यांनी केला.
.








