ऑनलाईन टीम / मुंबई :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची भेट घेतील. पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने त्या उद्या (बुधवारी) मुंबईतील काही बडय़ा उद्योगपतींचीही भेट घेतील. तसेच त्यांना एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझिनेस समिटसाठी निमंत्रण देतील.
तृणमूल आणि काँग्रेस यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे. राज्यात गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी हा दौरा असणार आहे. दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जी आघाडी सरकारच्या दोन सदस्य असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्या तरीही त्या काँग्रेसच्या नेत्यांना भेटणार नाहीत.
दरम्यान, मागील आठवडय़ात ममता बॅनर्जी यांनी विविध मागण्यांसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.









