भवानीपूरमधून दीदींचा अर्ज दाखल
वृत्तसंस्था/कोलकाता
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात प्रियंका टिबरीवाल यांची निवड भाजपने उमेदवार म्हणून केली आहे. भवानीपूरमध्ये 30 सप्टेंबर रोजी मतदान तर 3 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होईल. ममता या भवानीपूरच्याच रहिवासी आहेत. त्यांनी 2011 आणि 2016 मध्ये विजय मिळवला होता.
डाव्या संघटनांच्यावतीने श्रीजीब बिस्वास हेदेखील या रणसंग्रामात उतरणार आहेत. काँग्रेसने मात्र या पोटनिवडणुकीसाठी कोणताही उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
बॅनर्जी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भवानीपूरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी `खेला होबे’च्या जोरदार घोषणा दिल्या. `खेला होबे’ ही विधानसभा निवडणुकीदरम्यान हीट घोषणा ठरली होती बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी आपला पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडून नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, येथून भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याकडून त्यांना पराभवाचा झटका बसला होता.
भवानीपूर मतदारसंघातून विजयी तृणमूलचे उमेदवार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी त्यांच्यासाठी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्यासाठी ममता यांना उपनिवडणुकीत विजय मिळवणे गरजेचे आहे.
भाजपकडून वकील टिबरीवाल
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात प्रियांका टिबरीवाल यांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्या व्यवसायाने वकील असून भाजपने त्यांना ममतांविरोधात उमेदवारी दिली आहे. त्यांनी 2020 मध्ये अंटली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता.
भवानीपूरमध्ये ममतांची कोंडी करण्यासाठी भाजपने बैरकपूरचे खासदार अर्जुन सिंह यांच्याकडे निरीक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. अर्जुन सिंह यांना खासदार सौमित्र खान तसेच ज्योतिर्मय सिंह हेदेखील मदत करणार आहेत. भवानीपूरच्या प्रभारीपदाची जबाबदारी संजय सिंह यांच्याकडे सोपवण्यात आलीय.









