पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जवळ आली असतानाच तृणमूलमधील दुफळी उघड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँगेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आणि वजनदार नेते सुवेंदू अधिकारी यांनी मंत्रिपद सोडले आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात आहे. मात्र अधिकारी यांनी त्यांचे पत्ते अद्याप उघडलेले नाहीत. भाजपने त्यांच्यासाठी दरवाजे मोकळे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्यापाठोपाठ आणखी 2 ते 3 मंत्री आणि काही आमदारही पदत्याग व पक्षत्याग करून बाहेर पडतील अशीही चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर
पश्चिम बंगालमध्ये येत्या मे महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या राज्यात भाजपने अनपेक्षितरित्या चमक दाखवत 42 पैकी 18 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या आणि ममता बँनर्जींना जोरदार टक्कर दिली होती. भाजपला मतेही जवळपास तृणमूल काँगेसइतकीच होती. त्यामुळे तेव्हापासूनच भाजपने विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने रणनीती आखण्यास प्रारंभ केला असून त्यातच सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्यामुळे तृणमूलमधली पक्षांतर्गत धुसफूस वाढली असल्याचे दिसून येत आहे.
बॅनर्जींवर नाराजी
सुवेंदू अधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून ममता बॅनर्जींवर नाराज होते. बॅनर्जी अहंकारी असून त्यांचा जनतेशी संपर्क तुटला आहे. तसेच त्यांच्या राज्यात भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला आहे, असे आरोप त्यांनी अनेकदा केले. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमधला दुरावा स्पष्ट दिसून येत होता. आता त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.









