अन्य नऊ जणांचाही पक्षात प्रवेश
प्रतिनिधी /पणजी
तृणमुल काँग्रेसमध्ये दाखल होण्यासाठी कोलकाता येथे गेलेले ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो आणि अन्य नऊ जणांनी बुधवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पक्षात रितसर प्रवेश केला.
फालेरोंसोबत मगो पक्षाचे फोंडय़ाचे माजी आमदार लवू मामलेदार, प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस ऍड. यतिश नाईक, विजय पै, माजी सचिव मारियो पिंटो, युवा अध्यक्ष रवींद्रनाथ फालेरो, राजेंद्र काकोडकर, ऍड. आंतोनियो दा कॉस्ता, साहित्यिक एन. शिवदास आणि आनंद नाईक यांनीही तृणमुलमध्ये प्रवेश केला.
फालेरो यांनी सोमवारी आमदारकी आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यासह संबंधित अन्य पदाधिकाऱयांनीही त्याच दिवशी काँग्रेस सदस्यत्वाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर मंगळवारी ते सर्वजण कोलकाता येथे जाण्यास निघाले व काल बुधवारी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमुलमध्ये प्रवेश केला.
प्रवेश सोहळ्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना फालेरो यांनी गोवा हा भारताचा मुकुटमणी असल्याचा उल्लेख केला. स्वतंत्र संस्कृती आणि परंपरेसाठी हे राज्य प्रसिद्ध आहे. अनेक परकीय आक्रमणानंतरही ही संस्कृती आणि परंपरा गोव्याने जपली आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गोव्याची मातृभाषा कोकणी करण्यात आणि राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देण्यात आपण योगदान दिले, असेही त्यांनी सांगितले. विद्यमान राजकारणाला गोमंतकीय कंटाळले असल्यामुळे ते अन्य पर्याय शोधत असून लवकरच होणाऱया निवडणुकीनंतर तृणमुलच्या रुपाने तो त्यांना मिळणार असल्याचा दावा फालेरो यांनी केला. पत्रकार परिषदेस तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि इतरांची उपस्थिती होती.









