ऑनलाईन टीम / गोवा
गोवा विधानसभेच्या फैरी आता झडू लागल्या असून दिवसें – दिवस राजकिय हालचालींना वेग येतो आहे. या पार्श्वभूमीवर आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी न दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपवर निशाणा साधला. याचबरोबर उत्पल पर्रिकर यांना आपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफऱ दिली आहे.यावर बोलताना केजरीवाल यांनी भाजपाने आता आपलं यूज अँड थ्रो धोरण पर्रिकर परिवारासोबतही वापरलं आहे, असे म्हणत भाजपवर सडकून टीकास्त्र सोडले आहे.
याबद्दल अरविंद केजरीवाल यांनी एक ट्वीट करत म्हटले आहे कि, गोव्यातल्या लोकांना फार वाईट वाटत असेल भाजपने आता आपलं यूज अँड थ्रो धोरण पर्रिकर परिवारासोबतही वापरलं आहे. मी मनोहर पर्रिकर यांचा कायम आदर केला. उत्पलजी आम आदमी पक्षात सामील होण्यास आणि आपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास तुमचं स्वागत असेल.
भाजपाने आज आपल्या गोव्यातल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र त्यात पक्षाने उत्त्पल पर्रिकर यांना उमेदवारी दिलेली नाही. त्याऐवजी पणजी मतदारसंघातून अटान्सिओ मॉन्सेरेट या नेत्याला तिकीट देण्यात आलं आहे. मॉन्सेरेट यांच्यावर २०१६ साली एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे हा विषय राजकिय पटलावर चिघळला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामूळे या प्रकरणावर भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.