अवधूत यदूला म्हणाले, इतक्मया गुरुंपाशी मी जे जे काही स्वबुद्धीने शिकलो, ते तुला आत्तापर्यंत सांगितले. मी आपल्याच बुद्धीच्या धोरणाने व युक्तीने आणखी कित्येक गुण शिकलो आहे, तेही तुझ्यावरील अनन्य प्रीतीमुळे सांगतो. वैराग्य म्हणजे अमुक एक हवे किंवा अमुक एक नको अशी इच्छा न होणे. हा वैराग्यविचार म्हणजे 24 गुरुंचाही गुरु असे समज. तो या नरदेहातच प्राप्त होत असतो. याकरिता देह हाच मुख्य गुरु होय.
हे चतुरश्रे÷ा! परमार्थाचे संरक्षण करण्यासाठी देहाला जे गुरुत्व आले आहे, ते दोन प्रकारांनी आलेले आहे. त्याचीही लक्षणे तुला सांगतो. देहाइतके वाईट पृथ्वीमध्ये दुसरे काही नाही पण तसेच देहाइतके चांगलेही त्रिभुवनात काही नाही. म्हणून वाईटाचा त्याग करावा, तर मोक्षसुख अंतरते बरे, तो चांगला म्हणून त्याचा उपभोग घ्यावा तर हटकून नरकात पडावे लागते. याकरिता त्याचा त्यागही करू नये आणि त्याचा भोगही घेऊ नये. त्याला दोन्ही अवस्थांच्या मधोमधच राखून ठेवावे. आपल्या हिताकरिता त्याला आत्मसाधनात गुंतवावे. ज्याप्रमाणे आपले कार्य साधून घेण्यासाठी भाडय़ाचे घोडे आपल्या मुक्कामापर्यंत आपण नेतो पण पुढे त्याची काळजी घेत नाही. त्याप्रमाणे परमार्थावर हेतु ठेवून घरामध्ये वस्ती करावयाची ती अगदी उदासीन वाटसराप्रमाणे करावी. देहाच्या आसक्तीची गोष्ट, बुद्धीच्या टप्प्यापर्यंत येऊ देऊ नये. देह नश्वर आहे आणि नश्वरत्वामुळेच विरक्ती उत्पन्न होते. मुमुक्षु कोणत्याच नाशवंत वस्तूवर आसक्ती ठेवत नाही आणि ज्याने विरक्ती उत्पन्न होते, तोच खरोखर विवेक होय. मिळून विवेकाची आणि वैराग्याची प्राप्ती आपल्याच विचाराने मनुष्यदेहामध्ये होते. इतर प्राणिमात्रांच्या देहामध्ये हा विचारच असत नाही. कारण इतर देह धारण करणारे प्राणी केवळ शिस्नोदराचाच व्यवसाय करीत असतात. म्हणून मनुष्यदेह हा एक अमूल्य ठेवा आहे. त्याच्या योगाने ब्रह्मसायुज्यात जाता येते, म्हणून देवसुद्धा नरदेहाची इच्छा करतात. म्हणून नरदेह हा मोठा पवित्र आहे असे तू म्हणशील, पण तो अत्यंत निंद्य आहे असे समज. कारण त्याचा जन्म योनीद्वारे असून मरण हे त्याच्या सर्व अवस्थात अगदी पाठीशीच लागलेले आहे. असे असताही आपल्या मरणाचा विसर पडून तारुण्याचा भयंकर ताठा चढतो. चतुर, शहाणा, ज्ञाता, बलवान सर्व काय तो मीच आहे, असे आपण म्हणत असतो. ‘तारुण्याची नवाळी’ म्हणजे तारुण्यऋतूंतील फळ, देठ न फेडताच काळ गिळून टाकतो. मग म्हातारपणाने जर्जर होऊन मरणकाळ प्राप्त होतो. मृत्यूची धाड आलेली पाहिली की, पायात पाय अडखळू लागतात, जिभेची बोबडी वळते, आणि साऱया अंगातील नाडय़ा तुटून जातात. मरण लवकर आले नाही तर, म्हातारपणाची विटंबना फारच कठीण असते. आपली बायको, मुले व इतर माणसेही जवळ येईनाशी होतात. जिणे निखालस केविलवाणे होते. म्हातारा हो असा लहानपणी ज्यांनी आशीर्वाद दिला, त्यांनी खरोखर तो शापच दिला म्हणण्यास हरकत नाही. कारण म्हातारपणासारखे दुःखदायक असे दुसरे काहीच नाही. म्हातारपणाचे दुःख अशा तऱहेचे असते हे तरुणपणी लक्षात घेऊन अशी दशा पुढे मलाही हात धरून येईल, असे समजले पाहिजे.
अवधूत म्हणाले, नरदेहाची प्राप्ती म्हणजे मोठे घबाड मिळवल्यासारखे आहे म्हणून माणसाने त्याचा त्यागही करू नये किवा भोगही घेऊ नये. त्यानं देहाचा उपयोग करून घेऊन मोक्ष साधना करावी. देहाला त्याचं रक्षण होईल एव्हढंच भरणपोषण करावं कारण साधनेसाठी धडधाकट देह अत्यंत आवश्यक आहे पण हा समतोल राखणं माणसाला सहजी शक्मय होत नाही त्याची अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे देह हा षड्विकारांनी भरलेला आहे. त्या एकेक विकारामध्ये आणखी कोटय़वधी अनर्थ आहेत. अग्नीत तुपाच्या धारा पडाव्यात आणि तो आणखी प्रदिप्त व्हावा त्याप्रमाणे त्या विकारात सहा ऊर्मी लागून राहिलेल्या आहेत.
दुसरं कारण म्हणजे देह हेच दुःखाचे मूळ आहे. त्यामुळे देहाचे स्तोम माजवले तर दुःख वाढून अखेर महादुःख हेच फळ मिळते. म्हणून देहाची संगती ही निरंतर दुःखदायक असते. हे लक्षात घेऊन त्याची आसक्ती सोडून द्यावी.







