नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कथित मनी लाँडरिंग प्रकरणात युनिटेकचे संस्थापक रमेश चंद्रा यांच्यासह त्यांची सून प्रिती चंद्रा आणि अन्य एका प्रशासकीय अधिकाऱयाला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. सोमवारी सायंकाळी दिल्ली येथून तिघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांची रवानगी कोठडीमध्ये करण्यात आली आहे. प्रिती चंद्रा ही युनिटेकचे माजी मालक संजय चंद्रा यांची पत्नी आहे. युनिटेक लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीचे संस्थापक रमेश चंद्रा आणि त्यांची दोन मुले संजय आणि अजय चंद्रा यांच्याविरुद्ध बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर कॅनरा बँकेकडून 198 कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांनी खरेदीदारांच्या पैशांचा गैरवापर करत ते पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवले असा आरोप आहे. अलीकडेच, नोएडामध्ये ईडीने त्यांच्या 32 कोटी रुपयांच्या दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. संजय चंद्रा यांच्यासह त्यांच्या भावाला यापूर्वीच अटक झाली असून ते सध्या मुंबईतील कारागृहामध्ये आहेत. यापूर्वी ते तिहार जेलमध्ये होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना मुंबई तुरुंगात हलवण्यात आले आहे.









