वार्ताहर/ उसगांव
काँग्रेस सरचिटणीस तथा उसगांव गांजे पंचायतीच्या पंचसदस्य मनिषा उसगांवकर यांनी आपल्यावर केलेल्या आरोपात काही तथ्य नसून वैफल्यग्रस्त बनल्याने त्या बिनबूडाचा आरोप करीत असल्याचा खुलासा उसगांव गांजे पंचायतीचे सरपंच नरेंद्र गांवकर यांनी केला आहे.
म्हापसा येथे पत्रकार परिषदेत मनिषा उसगांवकर यांनी उसगांव पंचायतीचे सरपंच व सचिवावर आरोप करताना प्रक्रिया न करता बँकेतून पैसे काढल्याचा आरोप केला होता. त्यावर खुलासा करताना सरपंच नरेंद्र गांवकर यांनी सांगितले की, राज्य सरकार व मंत्री विश्वजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली उसगांव गांजे ग्रामपंचायतीचा चौफेर विकास होत असल्याने विरोधी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस व उसगांव गांजे पंचायतीच्या पंचसदस्य मनिषा उसगावकर या तथ्यहिन आरोप कऊन लोकांची दिशाभूल करीत आहेत. पंचायतीचा आर्थिक व्यवहार स्वच्छ व पारदर्शक आहे. वाळपई मतदारसंघाचे आमदार व मंत्री विश्वजीत राणे यांनी उसगांव गांजे पंचायत क्षेत्रात अनेक विकासाचे प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. हल्लीच नवीन पंचायत इमारत प्रकल्पाचा लोकार्पण समारंभ झाला. भाजपा सरकार करीत असलेला विकास पचनी न पडल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन त्या निराधार आरोप करीत असल्याचे सरपंच नरेंद्र गांवकर यांनी म्हटले आहे.









